बहिष्कार घालण्याचे आवाहन
कराची (पाकिस्तान) – रमझानचा महिना चालू होताच जगभरातील मुसलमान उपवास करतात आणि इफ्तारच्या वेळी खजूर खातात. हमास आणि इस्रायल यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जगात अनेक ठिकाणी इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे; परंतु रमझानच्या मासात इस्रायली खजूर पुन्हा एकदा बाजारात आले. कराचीच्या बाजारपेठेत इस्रायली ‘मेडजूल खजूर’ आढळत असल्याविषयी काही लोकांनी चिंता व्यक्त केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते झुल्फिकार अली भुट्टो ज्युनियर यांनी सामाजिक माद्यमांतून हे सूत्र उपस्थित करत म्हटले की, कराचीच्या बाजारांमध्ये इस्रायली खजूर विकले जात आहेत. मेडजूल खजूर मूळतः मोरोक्कोमध्ये पिकवले जात होते; परंतु आता ते पॅलेस्टाईन, जॉर्डन, इराण आणि सौदी अरेबिया या देशांमध्येही पिकवले जातात. सध्या इस्रायल खजूराचा सर्वांत मोठा निर्यातदार आहे. पॅलेस्टिनी भूमीवर त्याच्या अवैध ज्यू वसाहती आहेत. येथे त्यांची शेती आहे. पॅलेस्टिनी लोकांचे दुःख वाढवणारे कोणतेही उत्पादन खरेदी न करणे, हे आपले नैतिक आणि धार्मिक दायित्व आहे.’ त्यांनी बाजारांतील दुकानांमधून इस्रायली खजूर काढून टाकण्याचे आवाहन केले.
इस्रायली खजूर ओळखण्याचे आवाहन !
पाकिस्तानमधील लोकांना खजूरच्या कोणत्याही पॅकेटवरील ‘बारकोड’ पडताळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इस्रायलमध्ये बनवलेल्या उत्पादनांचा बारकोड सहसा ‘७२९’ या आकड्यांपासून चालू होतो. हे उत्पादन इस्रायली मानक संघटना ‘जीएस्१’ मध्ये नोंदणीकृत आहे, असे यातून सूचित होते.
तथापि काही इस्रायली उत्पादने त्यांची खरी ओळख लपवण्यासाठी इतर नावांनी विकली जाऊ शकतात. अशा परिस्थितीत ग्राहकांना पाकिटावर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचण्याचा, नावांविषयी ऑनलाईन शोध घेण्याचा आणि पॅलेस्टाईन किंवा इतर मध्य पूर्वेकडील देशांमधून खजूर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.