MLA Waheed Para : (म्हणे) ‘अमरनाथ यात्रेसाठी बांधण्यात येणार्‍या रस्त्यांमुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते !’

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या आमदार वाहीद पारा यांनी विधानसभेत उपस्थित केले सूत्र  

आमदार वाहीद पारा

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये बालटाल आणि पहलगाम येथे रस्ते बांधण्यात येत आहेत. विधानसभेत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी(पीडीपी)च्या आमदार वाहीद पारा यांनी या रस्त्यांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सांगितले की, या रस्त्यांच्या बांधकामामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते. यात्रा अशा प्रकारे आयोजित करावी की, पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.

यावर विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील शर्मा म्हणाले की, अमरनाथ यात्रेला विरोध करण्याचा पीडीपीचा इतिहास आहे. वर्ष २००८ मधील अमरनाथ यात्रेच्या वेळीही पीडीपीने हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या आणि आजही तीच मानसिकता दिसून येते. अमरनाथ यात्रा हा केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर तिच्याशी जम्मू-काश्मीरमधील सहस्रो लोकांचे जीवनमान जोडलेले आहे. जर वाहिद पारा यांचे सूत्र केवळ पर्यावरणाशी संबंधित असेल, तर ते केवळ अमरनाथ यात्रेविषयीच प्रश्न का उपस्थित करत आहेत ? काश्मीरमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यावरणावर चर्चा होऊ शकते; परंतु पीडीपी जाणूनबुजून हिंदूंच्या श्रद्धेला लक्ष्य करत आहे.

संपादकीय भूमिका

पर्यावरणाची हानी केवळ हिंदूंच्या सणांच्या किंवा यात्रेच्या संदर्भातच होत असल्याची ओरड नेहमी कशी होते ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कुणी पर्यावरणाची हानीचा प्रश्न उपस्थित करत नाही?