गोव्यात २४ घंट्यांत ४०.६४ मि.मी. पावसाची नोंद

पणजी, १७ जुलै (वार्ता.) – गेले १५ दिवस अगदी अल्प प्रमाणात असलेल्या पावसाने १६ जुलैच्या रात्रीपासून पुन्हा जोरदार प्रारंभ केला. रात्रभर मुसळधार पडलेल्या पावसामुळे अनेक भागात पूरजन्य स्थिती निर्माण झाली. गोव्यात २४ घंट्यांमध्ये ४०.६४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सांगे तालुक्यात सर्वाधिक १३२.०८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल सत्तरी तालुक्यात १२१.९२ मि.मी. पावसाची नोंद झाली. सांगे आणि सत्तरी तालुक्यांत नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती.
सत्तरी तालुक्यातील अनेक गावे जलमय
१६ जुलैच्या मध्यरात्रीपासून चालू झालेल्या मुसळधार पावसाने ठाणे पंचायत क्षेत्राला झोडपून काढले. १७ जुलै या दिवशी सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने नगरगाव वाळपई हा परिसर जलमय झाला. रस्त्यांवरून पाणी वाहू लागल्याने दुचाकीस्वार आणि पादचारी यांना मोठा अडथळा निर्माण झाला. हेदोडे- नगरगाव मार्गावर नाल्याचे पाणी वेगाने रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. भटवाडी येथील नाल्याला पूर आल्याने पाणी घरांच्या अंगणात आणि बागायती यांमध्ये शिरले. त्यामुळे स्थानिक बागायतदारांची हानी झाली.
मुरमुणे-मेळावली रस्ता पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे रगाडा नदीला पूर आल्याने गुळेली पंचायत क्षेत्रातील मुरमुणे-मेळावली रस्ता पाण्याखाली गेला. यामुळे मुरमुणे, पैकुळ, शेळ, मैंगीणे आणि धडा या परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. प्रतिवर्षी पावसाळ्यात ही समस्या उद्भवत असल्याने स्थानिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. हा रस्ता सध्या बंद झाल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
पाली-सत्तरी येथील दत्तमंदिराच्या चारी बाजूंनी पाणी
पाली-सत्तरी येथे म्हादईच्या उपनदीला पूर आल्याने तेथील दत्तमंदिर परिसर पूर्ण जलमय झाला आणि काही काळ मंदिराच्या चारी बाजूंनी पाणी भरले. या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
सकाळी १०.३० नंतर पावसाचा जोर न्यून झाल्याने पाणी हळहळू ओसरू लागले. वेळूस परिसरातही नदीला पूर येऊन बागायतींची हानी झाली. काही घंट्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वाळपई परिसरातील नद्या आणि नाले भरून वाहू लागले अन् रस्ते जलमय झाले. अशा परिस्थितीत नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पर्ये मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची आमदार डॉ. देविया राणे यांच्याकडून पहाणी
पर्ये मतदासंघाच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी मतदारसंघातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पहाणी केली. त्या म्हणाल्या, ‘‘पाली येथील दत्तमंदिराजवळ असलेल्या संरक्षक भिंतीची उंची वाढवली जाईल. पाण्याचा निचरा सुधारण्यासाठी आणि भविष्यातील पूरस्थिती रोखण्यासाठी, ५ पाईप कलव्हर्ट्सच्या (रस्त्यांच्या खाली पाणी वाहून नेण्यासाठी टाकलेल्या गोलाकार सिमेंटच्या किंवा धातूच्या जलवाहिन्यांची रचना) जागी बॉक्स कलव्हर्ट्स (रस्त्यांच्या खाली पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेली काँक्रीटची चौकोनी किंवा आयताकृती चौकट) बसवले जातील आणि त्यांची उंचीही वाढवली जाईल.’’ त्यांनी अभियंत्यांना सदर जागेची पडताळणी करण्याच्या आदेश दिला.
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !