साधिकेवर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍यासाठीच सेवेच्‍या खोलीत सूक्ष्मातून मारक गंध आल्याचे  परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सांगणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एकदा मी सेवा करत असलेल्‍या ठिकाणी सूक्ष्मातून मारक गंध येत होता. त्‍या ठिकाणी सर्वांना तो गंध येत होता; पण मला असलेल्‍या तीव्र आध्‍यात्मिक त्रासामुळे मला तो गंध येत नव्‍हता. मला गंध येत नसूनही त्‍या गंधाच्‍या माध्‍यमातून माझ्‍यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत असल्याने माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली.

कु. तृप्ती कुलकर्णी

काही वेळाने प.पू. डॉक्‍टर त्‍या ठिकाणी आले. प.पू. डॉक्‍टरांना त्‍या गंधामुळे माझ्‍या आध्यात्मिक त्रासात वाढ झाल्याचे समजल्यावर ते म्हणाले, ‘‘तृप्तीवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठीच तो मारक गंध आला आहे. तो गंध पुष्कळ तीव्र असल्याने मला श्वासही घेता येत नाही. इतरांना तो  ६० टक्‍के घेता येत आहे; पण तृप्‍तीला १० टक्‍केही घेता येत नसेल.’’ नंतर त्‍यांनी सेवेच्‍या खोलीच्‍या शेजारी असलेल्‍या त्‍यांच्‍या खोलीत जाऊन पाहिले. तिथे तारक आणि मारक दोन्ही गंध येत होते. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तृप्तीचा आध्यात्मिक त्रास न्यून करण्यासाठी मारक आणि माझ्यासाठी तारक गंध येत आहे. देवाने गंधाच्या माध्यमातून रक्षण केले. चला ! देव आहे आपल्या समवेत.’’

‘मारक गंध यायला लागल्‍यापासून मला निराशा आली आहे’, असे मी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘त्या मारक गंधाचा तुझा स्थूलदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह या सर्वांवरच परिणाम होत आहे. असे असले, तरीही तुला सहन होईल, एवढाच सुगंध देव देत आहे.’’

– कु. तृप्‍ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक