साधकांप्रमाणेच मुक्या जिवांचीही काळजी घेऊन त्यांच्याकडून साधना करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे साधकांप्रमाणे मुक्या प्राण्यांवरही कृपा करून त्यांच्याकडून साधना करून घेतात’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कुत्र्यांची भीती घालवण्यासाठी कुत्र्याचे पिल्लू पाळण्याविषयी सूक्ष्मातून सुचवणे 

‘मला कुत्र्यांची पुष्कळ भीती वाटायची. ती घालवण्यासाठी गुरुमाऊलीने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला घरी कुत्र्याचे पिल्लू पाळण्याचे सूक्ष्मातून सुचवले. त्या पिल्लाचा रंग पांढरा असून त्याच्या डोक्यावर टिळा होता. त्याचे डोळे बोलके होते. कुत्र्याचे नाव ‘सात्त्विक’, असे ठेवण्याचे गुरुमाऊलीनेच सूक्ष्मातून सुचवले.

२. सात्त्विकची (कुत्र्याच्या पिल्लाची) चैतन्यमय गोष्टींकडे ओढ असणे

अ. ‘सात्त्विक’ मोठा होऊ लागला, तशी ‘त्याची अंतर्मनाने साधना चालू आहे’, असे मला जाणवत होते. घरात कुणीही कुंकू लावत असेल, तर तो शेजारी येऊन उभा रहायचा आणि त्याला कुंकू लावल्यावरच तो आपल्या जागेवर जाऊन बसायचा.

आ. कापूर आणि गोमूत्राचे उपाय करतांना तो जवळ येऊन कापूर आणि गोमूत्र लावून घ्यायचा.

इ. तो भक्तीसत्संग चालू असलेल्या खोलीत येऊन सत्संग ऐकायचा. त्याला परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ बघायला पुष्कळ आवडायचे. तो त्या ग्रंथाजवळ जाऊन झोपायचा. त्याला सनातनच्या प्रसार साहित्याचा साठा असलेल्या खोलीत जाऊन झोपायला आवडायचे.

३. साधकांना ओळखून त्यांच्यावर न भुंकणे 

‘सात्त्विक’मध्ये साधकांविषयी पुष्कळ प्रेमभाव होता. घरी इतर कुणीही आले, तर तो त्यांच्यावर भुंकायचा; पण त्याला साधक घरी आलेले पुष्कळ आवडायचे. त्यामुळे तो साधकांवर न भुंकता त्यांच्याजवळ प्रेमाने जायचा.

कु. अमिषा करमरकर

४. ‘सात्त्विक’ला (कुत्र्याला) तीव्र मधुमेह असूनही तो आनंदी आणि देवाच्या अनुसंधानात असल्याचे जाणवणे अन् त्याच्या माध्यमातून प्राण्यांचे वैद्य सनातन संस्थेच्या कार्याशी जोडले जाणे 

तो १ वर्षाचा असतांना त्याला मधुमेह झाला होता. त्याची शरिरातील साखर कधी कधी ५०० ते ७०० पर्यंत जायची, तरीही ‘तो आनंदी आणि देवाच्या अनुसंधात आहे’, असे मला जाणवायचे. त्याला पाहून प्राण्यांचे आधुनिक वैद्य त्याचे कौतुक करायचे. ते म्हणायचे, ‘‘शरिरातील साखरेचे प्रमाण एवढे अधिक असूनही तो आज देवामुळेच जिवंत आहे.’’ सात्त्विकच्या माध्यमातून तेही सनातन संस्थेच्या कार्याशी जोडले गेले.

५. रुग्णाईत ‘सात्त्विक’ने प्राण त्यागणे आणि त्याला जेथे पुरण्यासाठी नेले होते, तेथे चंदनाच्या फांद्या सापडणे 

काही दिवसांनी ‘सात्त्विक’ची प्रकृती बिघडत गेली आणि त्याने प्राण सोडले. तो गेल्यानंतर त्याच्यावर उपाय करायचे देवानेच सुचवले. त्याला जेथे पुरण्यासाठी नेले होते, तेथे गुरुमाऊलीच्या कृपेने चंदनाच्या फांद्या सापडल्या. त्या फांद्यांच्या पाल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून त्यावर ‘सात्त्विक’ला पुरले.

६. शिकायला मिळालेली सूत्रे 

अ. या सर्व प्रसंगांतून मला शिकायला मिळाले की, भगवंत जगातील प्रत्येक जिवाचा उद्धार करतो.

आ. भगवंत केवळ साधकांची नव्हे, तर मुक्या जिवांची काळजी घेऊन त्यांच्याकडून साधना करून घेतो.

७. मला गुरुमाऊलीचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. तेव्हा मी ‘सात्त्विक’विषयी त्यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तो कुत्रा नसून साधकच होता.’’

– कु. अमिषा करमरकर, रत्नागिरी (८.८.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.