George Soros Son Meets Muhammad Yunus : षड्यंत्रकारी अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या मुलाने बांगलादेशात जाऊन घेतली महंमद युनूस यांची भेट

अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा मुलगा अ‍ॅलेक्स सोरोस व बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस

ढाका (बांगलादेश) – भारतविरोधी धोरण चालवण्यासाठी कुप्रसिद्ध उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचा मुलगा अ‍ॅलेक्स सोरोस यांनी बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांची भेट घेतली आहे. ही बैठक अशा वेळी झाली, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशाला देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्यावर बंदी घातली आहे. अ‍ॅलेक्स सोरोस हे ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’चे अध्यक्ष आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जेव्हा महंमद युनूस संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेले होते, तेव्हा त्यांनी न्यूयॉर्कमध्ये जॉर्ज सोरोस यांचीही भेट घेतली होती. महंमद युनूस यांना अमेरिकेतील एका गटाचे समर्थन आहे आणि त्याच गटाने शेख हसीना यांचे सरकार पाडले आहे, असे बोलले जाते.

बांगलादेशाच्या आर्थिक सुधारणांवर चर्चा

बांगलादेशात अ‍ॅलेक्स सोरोस यांच्यासमवेतच्या बैठकीनंतर महंमद युनूस यांच्या कार्यालयाने सामाजिक माध्यमांत पोस्ट करत म्हटले की, ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’च्या नेतृत्वाने मुख्य अंतरिम सल्लागारांची भेट घेतली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी अन् महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा लागू करण्यासाठी बांगलादेशाच्या प्रयत्नांवर चर्चा केली.

बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार बैठकीत माध्यमस्वातंत्र्य, मालमत्ता पुनर्प्राप्ती, नवीन सायबर सुरक्षा कायदा, तसेच रोहिंग्या संकट यांवर चर्चा झाली.

‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ म्हणजे सरकारे पाडणारी संघटना !

जॉर्ज सोरोस यांच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ संघटनेवर नेहमीच पूर्व युरोप, मध्य-पूर्व, दक्षिण आशिया, तसेच दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये निवडून आलेल्या सरकारांना उलथवून स्वतःच्या पसंतीची सरकारे स्थापन करण्याचा आरोप केला जातो. सोरोस फाऊंडेशनने भारताविरुद्धही सातत्याने मोहीम चालवली आहे. शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनास हीच संघटना उत्तरदायी असल्याचे तज्ञांचे मत आहे.

मोदी सरकारची अपकीर्ती करण्याचाही प्रयत्न

मोदी सरकारची अपकीर्ती करण्यासाठी जॉर्ज सोरोस यांच्या संघटनेनेच भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात मोहीम चालू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जॉर्ज सोरोस यांनी अनेक वेळा उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत  निराधार आरोप केले आहेत. ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’च्या भारतातील कारवायांचीही चौकशी केली जात आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशाला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य बंद केल्यावर लगेचच सोरोस यांचा मुलगा बांगलादेशात पोचतो, यावरून बांगलादेशातील आतापर्यंतच्या उलथापालथीमागे कोण काम करत आहे, हे स्पष्ट होते ! राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतविरोधी सोरोस यांच्या नाड्या आवळण्यासाठी प्रयत्न करतील का आणि भारत त्यात काही हातभार लावणार आहे का ?