Waqf Bill Passed By Rajya Sabha : राज्यसभेतही रात्री अडीच वाजता वक्फ सुधारणा विधेयक संमत

नवी देहली – लोकसभेत २ एप्रिलच्या रात्री अडीच वाजता वक्फ सुधारणा विधेयक १२ घंट्याहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर संमत करण्यात आले. राज्यसभेत ३ एप्रिल या दिवशी यावर १२ घंट्यांहून अधिक काळ चर्चा करण्यात आल्यावर रात्री अडीच वाजता हे विधेयक १२८ विरुद्ध ९५ मतांनी राज्यसभेत संमत झाले. आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.

राज्यसभेत रात्री अडीच वाजल्यानंतर वक्फ सुधारणा कायदा संमत झाल्यानंरही राज्यसभेचे कामकाज पहाटे ४ वाजेपर्यंत चालू होते. त्यानंतर ते स्थगित करण्यात आले आणि पुन्हा सकाळी नियोजित म्हणजे ११ वाजता चालू झाले. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी म्हटले की, ही एक दुर्मिळ घटना आहे.

विधेयक संमत होणे, हा सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण ! – पंतप्रधान मोदी

वक्फ सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, ‘संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ सुधारणा विधेयक संमत करणे, हा सामाजिक, आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण आहे. हे विधेयक विशेषतः अशा लोकांना साहाय्य करेल, जे दीर्घकाळापासून बाजूला राहिले आहेत. अनेक दशकांपासून वक्फ व्यवस्थेत पारदर्शकता आणि दायित्व यांचा अभाव होता. यामुळे विशेषतः मुसलमान  महिला, गरीब मुसलमान, मुसलमानांच्या हिताची हानी झाली. संसदेने संमत केलेले कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या अधिकारांचे रक्षण करतील. संसदीय समितीच्या चर्चेत सहभागी झालेले आणि त्यांचा दृष्टीकोन मांडणार्‍या अन् कायद्यांना बळकटी देण्यासाठी योगदान देणार्‍या सर्व संसद सदस्यांचे आभार.’