३ महिन्यांच्या आत कोणत्याही व्याजाविना मुदत ठेव काढली जाऊ शकते !
नवी देहली – १ जानेवारीपासून मुदत ठेव (एफ्.डी.- फिक्स डिपॉझिट) नियमांमध्ये पालट झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम पालटले आहेत. सार्वजनिक ठेवींची संमती आणि परतफेड, नामनिर्देशन, आपत्कालीन खर्च, ठेवीदारांना ठेवीबद्दल सूचित करणे इत्यादी गोष्टींचा नव्या नियमांमध्ये समावेश आहे.
१. रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार ठेवीदार ३ महिन्यांच्या आत कोणत्याही व्याजाविना लहान ठेवीची (१० सहस्र रुपयांपर्यंत) संपूर्ण रक्कम काढू शकतील. त्याच वेळी मोठ्या ठेवींसाठी मूळ रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत किंवा ५ लाख रुपयांपर्यंत (जे कमी असेल) ३ महिन्यांच्या आत व्याजाविना काढले जाऊ शकते. गंभीर आजाराच्या संदर्भात ठेवीदारांना मुदत ठेवीच्या तारखेपासून ३ महिन्यांपूर्वी संपूर्ण मूळ ठेव काढून घेण्याची विनंती करण्याचा पर्याय असतो, जे कोणत्याही व्याजविना जारी केले जाते.
२. पूर्वी प्रारंभीच्या ३ महिन्यांत मुदतपूर्व पैसे काढण्याच्या अधिकारांना अनुमती नव्हती. तसेच ठेवीदारांना मुदत ठेवीच्या मुदतपूर्तीच्या तारखेबद्दल किमान २ महिने अगोदर माहिती देणे आवश्यक होते; पण आता हा कालावधी १४ दिवसांचा करण्यात आला आहे.