-
प्रफुल्ल कसबे पसार
-
पोलिसांच्या कृतीचे नागरिकांकडून कौतुक !

पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मकोका) केलेल्या कारवाईत जामीन मिळाल्यानंतर येरवड्यातील गुंड प्रफुल्ल कसबे आणि त्याचे साथीदार यांनी फेरी काढून दहशत माजवली. पोलिसांनी या प्रकरणी कसबे याच्यासह ३५ ते ४० साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी कसबेच्या साथीदारांना पकडून येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात त्यांची धिंड काढून त्यांना चोप दिला. पोलिसांनी चौकामध्ये तात्पुरता मंडप उभा करून पडद्याआड नागरिकांच्या समक्ष त्यांना चोप दिल्याने पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले.
‘मकोका’तून जामीन मिळाल्यानंतर येरवडा कारागृहातून बाहेर पडलेला कसबे आणि त्याच्या साथीदारांनी ७ जानेवारी या दिवशी येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातून दुचाकीवरून फेरी काढली होती. ‘येरवड्यातील मीच भाई’ अशी चित्रफीत सामाजिक माध्यमांत प्रसारित करून त्याने दहशत माजवली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी कसबे आणि त्याच्या साथीदारांचा शोध चालू केला. कसबे पोलिसांना सापडला नाही; परंतु साथीदारांना कह्यात घेऊन भरचौकामध्ये धिंड काढत त्यांना पोलिसांनी चोप दिला.
संपादकीय भूमिका :प्रत्येकच ठिकाणच्या पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई केल्यास दहशत माजवणार्यांवर वचक बसेल ! |