(टीप : ब्रेन ड्रेन, म्हणजे कुशल आणि शिक्षित तरुणांचे विदेशात स्थलांतर)
१. १० वर्षांत २५ लाख भारतियांचे विदेशात स्थलांतर
‘वर्ष २०१४ ते २०२४ या काळात २५ लाख भारतियांनी चांगल्या संधींच्या शोधात भारत सोडला. याचा थेट परिणाम केवळ आपल्या अर्थव्यवस्थेवरच नाही, तर आपल्या राष्ट्रीय अभिमानावरही झाला आहे. हा केवळ एक आकडा नाही, तर आपल्या देशाच्या आत्म्यावरील सर्वांत मोठा डाग आहे. हा तोच भारत आहे, ज्याला एकेकाळी विश्वगुरु म्हणण्याचा मान मिळाला होता; पण आज आपली प्रतिभा, आपले डॉक्टर, आपले अभियंते, आपले शास्त्रज्ञ असे सर्वच परकियांच्या कुशीत जात आहेत. भारत स्वतःच्या मुलांसाठी योग्य व्यासपीठ बनू शकला नाही का ? भारतमातेची कुस रिकामी होत असतानांही आपण त्याविषयी बोलणार नाही, ही हतबलता आहे कि शक्यता ?
२. ‘ब्रेन ड्रेन’मुळे देशाची हानी
अ. १ लाख २० सहस्र कोटी रुपयांची हानी : हा आकडा भारताच्या एकूण वार्षिक अंदाजपत्रकाच्या अनुमाने २५ टक्के आहे. भारताच्या ‘वस्तू आणि सेवा कर’ संकलनाच्या ६ मासांच्या समतुल्य, तसेच पाकिस्तानच्या संपूर्ण वार्षिक अंदाजपत्रकाहून अधिक आहे. कल्पना करा, ही रक्कम आपल्या शाळा, रुग्णालये, संशोधन आणि विकास यांमध्ये गुंतवता आली असती.
आ. आरोग्य क्षेत्राची हानी : गेल्या १० वर्षांत भारतातील ५ लाख डॉक्टर न्यून झाले. हे डॉक्टर प्र्रतिवर्षी लक्षावधी भारतियांचे प्राण वाचवू शकत होते; पण आज ते परकीय भूमीवर काम करत आहेत. हा भारतीय जीवनाचा अपमान नाही का ?
इ. नवकल्पना आणि विज्ञान यांचा र्हास : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात २ लाख ५ सहस्र कोटी रुपयांच्या संभाव्य उत्पन्नाची हानी होते. भारतातील प्रत्येक चौथा अभियंता विदेशात कार्यरत आहे. भारत आता केवळ मनुष्यबळ पाठवणारा देश राहील का ?
३. भावनिक बाजू : भारतमातेची हाक
जेव्हा एखादा तरुण त्याच्या आईला सोडून विदेशात जातो, तेव्हा भारतमाता कोणत्या परिस्थितीतून जाते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?, हे केवळ एका व्यक्तीचे स्थलांतर नाही, तर हे भारतमातेच्या स्वप्नांचे विस्थापन आहे. प्रत्येक वेळी भारतीय विदेशात गेल्यावर आपल्या मातीतून उगवलेले फूल दुसर्याच्या बागेत खायला घालण्यासारखे आहे. हे आपल्या मुलांचे भविष्य दुसर्याच्या हातात देण्यासारखे आहे. तुम्ही आपल्या मातृभूमीची अशा प्रकारची लूट पाहू शकता का ?
४. ‘ब्रेन ड्रेन’ची कारणे आणि उत्तरदायित्व
अ. सरकारचे अपयश : सरकार रोजगाराच्या पुरेशा संधी देऊ शकले नाही. संशोधन आणि विकास यांवरील गुंतवणूक गेल्या १० वर्षांत ‘जीडीपी’च्या (सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या) केवळ ०.६५ टक्के इतकी आहे.
आ. अधिक चांगल्या रहाणीमानाचा शोध : विदेशात उच्च वेतन, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सेवा तरुणांना आकर्षित करते.
इ. शिक्षणात मर्यादित संधी : जागतिक स्पर्धेत भारतीय विद्यापिठे मागे पडत आहेत.
ई. अधिक वेतनाची अपेक्षा : भारतात मिळणार्या वेतनापेक्षा विदेशात त्याच कामासाठी ५-७ पट अधिक पैसे मिळतात.
५. ‘ब्रेन ड्रेन’चे परिणाम
अ. भारताची २० लाख कोटी रुपयांची हानी : ही रक्कम भारताच्या ६ मासांच्या वस्तू आणि सेवा कराच्या संकलनाच्या बरोबरीची आहे. कल्पना करा, यातून १० सहस्र नवीन रुग्णालये बांधता आली असती, ५० सहस्रांहून अधिक शाळा अद्ययावत् करता आल्या असत्या, तसेच देशातील प्रत्येक गावाला ‘डिजिटल इंडिया’चा भाग बनवता येईल.
आ. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांची न्यूनता : ५ लाख डॉक्टरांच्या कमतरतेमुळे देशाचे आरोग्य क्षेत्र कमकुवत झाले आहे. उपचारासाठी थांबलेल्या गरीब माणसाच्या मृत्यूचे हे कारण नाही का ?
इ. नवकल्पनांमध्ये घट : भारत आता माहिती तंत्रज्ञान सेवांचे केंद्र बनला आहे; परंतु तंत्रज्ञान नवकल्पनांमध्ये अग्रेसर बनू शकला नाही.
ई. राष्ट्रीय स्वाभिमानाचा र्हास : जेव्हा तरुण प्रतिभा भारतातून बाहेर पडते, तेव्हा त्याचा आपल्या आत्मविश्वासालाही मोठा धक्का बसतो.
६. विदेशात होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी उपाययोजना
अ. रोजगाराच्या संधी वाढवणे : अधिक उद्योगांची उभारणी करणे आणि ‘स्टार्टअप’ला प्रोत्साहन देणे
आ. संशोधन आणि विकास यांमध्ये गुंतवणूक वाढवणे : ‘जीडीपी’च्या किमान २ टक्के संशोधन, विकास यांत गुंतवले पाहिजेत.
इ. स्पर्धात्मक वेतन आणि लाभ देऊ करणे : भारतीय आस्थापने आणि सरकारी संस्था यांना जागतिक दर्जाप्रमाणे वेतन अन् सुविधा द्याव्या लागतील.
ई. ‘ब्रेन गेन’ (भारतीय तरुणांना देशातच थांबवणे) योजना चालू करणे : विदेशात स्थायिक झालेल्या भारतियांना भारतात परतण्यासाठी आकर्षक धोरणे आखावी लागतील.
उ. जागतिक दर्जाचे शिक्षण देणे : भारतीय विद्यापिठांना नवीन उपक्रम आणि संशोधन यांची केंद्रे बनवायला हवीत.
७. भारतियांनी जागे होण्याची आवश्यकता !
हा केवळ आर्थिक हानीचा लढा नाही, तर तो आपल्या राष्ट्राभिमानाचा लढा आहे. प्रत्येक भारतियाने विचार केला पाहिजे. आपण आपली प्रतिभा, स्वप्ने आणि आत्मा विदेशात हरवू द्यायचा का ? सरकारला या विषयाला प्राधान्य द्यावे लागेल. हा केवळ आकड्यांचा प्रश्न नाही, तर भारताच्या भविष्याचा प्रश्न आहे. चला एकत्र पाऊल टाकूया आणि भारताची प्रतिभा भारतीय मातीतच वाढेल अन् देशाला गौरव प्राप्त होईल, याची निश्चिती बाळगूया. भारतमातेची हाक ऐका, जागे होण्याची वेळ आली आहे.
– डॉ. सुरेश चव्हाणके, संपादक, ‘सुदर्शन’ वाहिनी