भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यांची मागणी
सातारा, ४ जानेवारी (वार्ता.) – गड-दुर्ग आणि ऐतिहासिक स्थळे यांवर कायमस्वरूपी भगवा झेंडा उभारावा, अशी मागणी भाजपचे सातारा शहराध्यक्ष श्री. विकास गोसावी यांनी केली. या आशयाचे निवेदन गोसावी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या हिंदवी स्वराज्याचे संवर्धन दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. असे असूनही राज्यातील बहुतेक गड-दुर्ग यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी भगवा ध्वज दिसून येत नाही. आता तर काही गड-दुर्गांवर वेगवेगळ्या रंगाचे ध्वज दिसून येतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये असलेल्या जंजिरा गडावर असेच काहीसे चित्र आहे. मध्यंतरी जंजिरा गडावर शिवभक्तांना भगवा झेंडा नेण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला होता. हे अत्यंत चुकीचे आहे. सरकारने याचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्रातील गड-दुर्ग आणि ऐतिहासिक स्थळे यांवर कायमस्वरूपी भगवा झेंडा उभारावा.’’