नववर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई !
पुणे – नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून तस्करी करून आणलेला १ कोटी २० लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या कारवाईत १ सहस्र ६६८ मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने निगडी आणि नसरापूर या भागांतून ९ जणांना अटक केली आहे. गोवा तसेच केरळ येथून मद्याची अवैध तस्करी केली जाते. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अपप्रकार रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पथके सिद्ध केली आहेत. खासगी बसमधून गोव्यातील मद्याच्या बाटल्या विक्रीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर निगडीतील एका प्रवासी वाहतूक करणार्या खासगी बसच्या थांब्यावर सापळा लावून कारवाई करण्यात आली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणजित रजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपअधीक्षक सुजीत पाटील, संतोष जगदाळे उपस्थित होते.
या प्रकरणी प्रवासी वाहतूक करणार्या बसचा चालक आणि साहाय्यक यांना अटक करण्यात आली आहे. निगडीतून मद्याच्या बाटल्या खडकी भागात विक्रीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती चौकशीत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खडकी भागातून ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ६८ लाख ३७ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर येथे केलेल्या कारवाईत ५१ लाख ९५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एका गोदामात मद्यसाठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. पथकाने तेथे कारवाई करून ४ आरोपींना अटक केली, त्यांच्याकडून मद्यसाठा जप्त करण्यात आला.