बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात वाशी (नवी मुंबई) येथे मोर्चा !

४ – ५ सहस्र हिंदूंचा संघटित आविष्कार

मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झालेले हिंदू

वाशी (नवी मुंबई) – बांगलादेशामधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ नवी मुंबईतील सकल हिंदु समाजाच्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील श्री गावदेवी मरीआई माता मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात विविध धार्मिक संस्था, संघटना, संत, कीर्तनकार आणि धर्माभिमानी हिंदू नागरिक ४ ते ५ सहस्रांच्या संख्येत सहभागी झाले होते. मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे करण्यात आला. ‘इस्कॉन’ मंदिराचे महंत अद्वैत चैतन्यप्रभु दास महाराज आणि बजरंग दल कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरीया यांनी मोर्चाला संबोधित केले.

नवी मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याची मागणी !

‘नवी मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना पोलीस प्रशासनाने त्वरित देशातून बाहेर काढावे, तसेच नवी मुंबईतील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेतील बांगलादेशी घुसखोरांवर समिती आणि पोलीस यांनी कारवाई करावी. या ठिकाणी बांगलादेशींऐवजी स्थानिकांना कामावर घ्यावे’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.


संपादकीय भूमिका

अशी मागणी करावी का लागते ? नवी मुंबई प्रशासन बांगलादेशी घुसखोरांना हाकलून का देत नाही ?