संपादकीय : बांगलादेशींचे आव्हान !

नागालँड पोलिसांच्या कारवाईत अमली पदार्थांची तस्करी करतांना पकडण्यात आलेली टोळी ( फोटो सौजन्य: ANI )

नागालँड पोलिसांनी ५ डिसेंबर या दिवशी राज्यात पकडलेल्या ३४ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नागालँडमध्ये ऑक्टोबर आणि आता चालू असलेल्या डिसेंबर या महिन्यांमध्ये केलेल्या ७९ कारवायांमध्ये हा साठा पकडण्यात आला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाद्वारे पकडला जाणारा अशा प्रकारचा अमली पदार्थांचा साठा ठराविक कालावधीनंतर नष्ट करण्याची कार्यवाही ही प्रत्येक राज्यात केली जाते. उत्पादन शुल्क विभाग ज्याप्रमाणे कारवाईत पकडलेले मद्य नष्ट करते, त्याप्रमाणे अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट केले जातात. अमली पदार्थविरोधी पथकाच्या नियमितच्या कारवाईतील हा एक भाग आहे. त्यामध्ये विशेष काय ? असे कुणाला वाटेल; परंतु यापूर्वीही जुलै ते सप्टेंबर या कालावधीत नागालँड पोलिसांनी ३० कोटी ५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा नष्ट केला. अशा प्रकारे २-३ मासांनी जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट केले जातात; परंतु जे अमली पदार्थ पकडले जात नाहीत, ते समाजात वितरित होतात आणि प्रतिमहिन्याला सापडणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांची आकडेवारी पहाता वितरित होणारे अमली पदार्थ अब्जावधी रुपयांच्या संख्येत असतील, ही राष्ट्रापुढील खरी समस्या आहे. हा विषय केवळ नागालँडपुरता मर्यादित नाही, तर ती संपूर्ण देशाची अत्यंत गंभीर समस्या आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या शेजारी देशांच्या सीमांतून अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात भारतात होते. मागील काही मासांमध्ये मुंबईमध्ये अमली पदार्थविरोधी कारवायांमध्ये पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या तस्करांमध्ये काही बांगलादेशी नागरिक आढळले आहेत. अमली पदार्थ आणण्यात बांगलादेशी नागरिकांचा सहभाग वाढत असल्याचे गेल्या काही मासांच्या आकडेवारीवरून दिसून येईल. यातील महत्त्वाचा भाग, म्हणजे अमली पदार्थांच्या तस्करीसाठी बांगलादेशी घुसखोरांना पद्धतशीरपणे भारतात प्रस्थापित केले जात आहे.

मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने पुणे येथील धोबीघाट, भैरोबा नाला येथे अवैधरित्या रहाणार्‍या ३ बांगलादेशी घुसखोरांना अमली पदार्थांची तस्करी करून ‘अल कायदा’ या जिहादी संघटनेच्या ‘अन्सारुल्ला बांगला’ या आतंकवादी संघटनेला अर्थसाहाय्य केल्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा ठोठावली. यात गंभीर, म्हणजे या बांगलादेशी घुसखोरांकडे ‘पॅनकार्ड’, ‘आधार कार्ड’, ‘मतदान ओळखपत्र’, ‘शिधापत्रिका’ ही भारतीय ओळखपत्रे मिळाली. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ही माहिती न्यायालयात सादर केली. जे अपप्रकार पुणे येथे चालू आहेत, तेच मुंबईमध्येही चालू आहेत. बांगलादेशी सीमेला लागून असलेल्या बंगालमध्ये याविषयीची स्थिती काय असेल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. बांगलादेशी घुसखोरांना भारतात प्रस्थापित करणे, हे काही एकट्यादुकट्याचे काम नाही. त्यांना भारतात प्रस्थापित करण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत आहे, ही खरी देशापुढील गंभीर समस्या आहे आणि तिला अमली पदार्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थसाहाय्य होत आहे. त्यामुळे अमली पदार्थांच्या माध्यमातून व्यसनाधीनता हे तर गंभीर सूत्र आहेच; परंतु या माध्यमातून चालू असलेले राष्ट्रविरोधी कारवायांचे षड्यंत्र ही आणखी मोठी गंभीर समस्या आहे. त्यामुळे याकडे मोठ्या गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. काही वर्षांपूर्वी ‘उडता पंजाब’ नावाचा हिंदी चित्रपट प्रसारित झाला. त्यात अमली पदार्थांनी पोखरलेल्या पंजाबची विदारक स्थिती दाखवण्यात आली आहे. यातून पंजाबची अपकीर्ती झाल्याची टीका काहींनी केली; मात्र हे वास्तव आहे आणि याविषयी वेळीच कारवाई न झाल्यास भारतातील विविध राज्यांमध्ये अमली पदार्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात फोफावेल.

समाजविघातकामागे राष्ट्रघात !

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्रात ६७३ कोटी २२ लाख रुपयांची अवैध मालमत्ता पकडण्यात आली. यामध्ये पैसे, मद्य, अन्य मूल्यवान वस्तू यांसह अमली पदार्थ यांचे मूल्य कोट्यवधी रुपयांमध्ये होते. याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या; मात्र ‘नियमितच्या कारवाया’ म्हणून याविषयीची संवेदनशीलता न्यून होत आहे, ही वस्तूस्थिती आहे; परंतु वर्ष २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांची आकडेवारी पाहिली, तर वर्ष २०२४ च्या लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांची रक्कम ही अब्जावधी रुपयांची आहे. या समाजविघातक कारवायांमागे देशविरोधी शक्तींचा सहभाग आहे.

काही वर्षांपूर्वी लाखो रुपयांचा घोटाळा, म्हणजे ‘मोठा घोटाळा’ समजला जात होता. वृत्तपत्रांमध्ये त्याची ठळकपणे वृत्ते यायची. सद्यःस्थितीत मात्र घोटाळ्यांची संख्या सहस्रो कोटींमध्ये असते. लाखो रुपयांच्या घोटाळ्याची वा भ्रष्टाचाराची वृत्तेही सध्या माध्यमांमध्ये यायची बंद होत आहेत. अशीच काहीशी असंवेदनशीलता अमली पदार्थांच्या तस्करीची झाली आहे. निवडणुकीच्या काळात नियमितपणे पकडल्या जाणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांच्या साठ्याविषयी समाजालाही सवय झाली आहे. कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पकडले, तरी त्याचे पडसाद समाजात उमटतांना दिसत नाहीत. समाजात पकडले जाणारे अमली पदार्थ, म्हणजे हिमनगाचे टोक असते. अन्वेषण यंत्रणेद्वारे ४-५ टक्के अमली पदार्थ पकडले जात असतील, तर ९०-९५ टक्के अमली पदार्थांची तस्करी होते.

यापूर्वी अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये आफ्रिकेतील गरीब देशांतील नागरिकांचा सहभाग अधिक होता. सद्यःस्थितीत मात्र बांगलादेशी घुसखोरांचे यातील वर्चस्व वाढले आहे आणि यामागे केवळ अर्थार्जन नाही, तर देशविघातक प्रवृत्तींची भारताला पोखरणारी यंत्रणा यामागे कार्यरत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांना खोटी भारतीय कागदपत्रे पुरवून त्यांना प्रस्थापित करणे, हे नियोजित यंत्रणेविना शक्य नाही. भारतात कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पकडले जात असूनही त्यांचा पुरवठा करणारी यंत्रणा कार्यरत आहे. वरवर पैशांसाठी अमली पदार्थांची यंत्रणा दिसून येत असली, तरी त्यामागे पाकिस्तानातील देशविरोधी यंत्रणा कार्यरत आहे. बांगलादेशी घुसखोर आणि आफ्रिकन नागरिक यांना पैसे देऊन हा पैसा भारतविरोधी शक्तींना जात आहे. त्यामुळे केवळ अमली पदार्थ पकडून आणि नष्ट करून भागणारे नाही, तर ही यंत्रणा चालवणार्‍या भारतविरोधी शक्ती, त्यांचे हस्तक आणि त्यांना साहाय्य करणारे भारतीय यंत्रणेतील लोक यांचा बीमोड करणे आवश्यक आहे.

बांगलादेशी घुसखोर आणि अमली पदार्थ तस्कर यांना भारतात प्रस्थापित करणार्‍या भारतीय हस्तकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !