१. वनात फिरणारे श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाहून वानरदलाला संशय येणे
प्रभु श्रीरामाची श्री हनुमानाशी पहिली भेट झाली, तेव्हा रावणाने सीताहरण केले होते. श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत वनात पोचले. सुग्रीवाच्या निवासस्थानाचा शोध घेत राम-लक्ष्मण जेव्हा ऋष्यमूक पर्वताजवळ पोचले, तेव्हा त्यांना पाहून वानरदलाला संशय आला.
आगें चले बहुरि रघुराया ।
रिष्यमूक पर्बत निअराया ॥
तहँ रह सचिव सहित सुग्रीवा ।
आवत देखि अतुल बल सींवा ।। १ ।।
(किष्किंधा कांड, श्रीरामचरितमानस)
अर्थ : रघुराय (श्रीराम) पुन्हा पुढे चालू लागले आणि ऋष्यमूक पर्वताजवळ आले. तेथे सुग्रीव त्याच्या सचिवांसह रहात होता. त्याने अतुलनीय बलाची सीमा असलेल्या (श्रीराम-लक्ष्मणांना) येतांना पाहिले.

२. सुग्रीवाने २ तरुणांविषयी माहिती काढण्यास हनुमानाला सांगणे
सुग्रीवाने अंजनी पर्वतावरून हनुमानाला बोलावले. हनुमान सुग्रीवाचे महामंत्री होते. सुग्रीव, जांबुवंत आणि इतर यांनी हनुमानाला सांगितले, ‘‘आमच्या जंगलात दोन तेजस्वी तरुण फिरत आहेत. ते कोण आहेत ? हे शोधून काढ. ते आम्हाला मारण्याच्या उद्देशाने तर आले नाहीत ? वालीनेच त्यांना पाठवले तर नाही ?’’ हनुमानाने साधूचे रूप धारण करून तो श्रीराम-लक्ष्मणाकडे गेला.
३. हनुमानाने विचारल्यावर श्रीराम आणि लक्ष्मण यांनी त्यांची ओळख करून देणे
साधू वेषातील हनुमान म्हणाला,
को तुम्ह स्यामल गौर सरीरा ।
छत्री रूप फिरहु बन बीरा ।।
कठिन भूमि कोमल पद गामी ।
कवन हेतु बिचरहु बन स्वामी ।। ४ ।।
(किष्किंधा कांड, श्रीरामचरितमानस)
अर्थ : हे सावळ्या आणि गौरवर्णीय पराक्रमी वीरांनो, क्षत्रिय रूपात वनात फिरणारे तुम्ही कोण आहात ? तुमच्या कोमल चरणांनी तुम्ही या कठोर भूमीवर चालत आहात. वनातील असह्य उष्णता आणि वारा सहन करत आहात. तुम्ही ब्रह्मा, विष्णु, महेश या तिघांपैकी कुणी आहात का ? किंवा तुम्ही नर-नारायण आहात ?
श्रीराम म्हणाले, ‘‘आम्ही कोसलराज दशरथजींचे पुत्र आहोत आणि पिताश्रींच्या वचनाचा मान राखण्यासाठी वनात आलो आहोत. आमची नावे राम आणि लक्ष्मण आहेत, आम्ही दोघे भाऊ आहोत. आमच्या सोबत एक सुंदर आणि सुकुमार स्त्री होती.’’
४. ‘श्रीराम’ हे नाव ऐकताच हनुमानाने श्रीरामाला साष्टांग दंडवत घालणे
इहाँ हरी निसिचर बैदेही ।
बिप्र फिरहिं हम खोजत तेही ।।
आपन चरित कहा हम गाई ।
कहहु बिप्र निज कथा बुझाई ।। २ ॥
(किष्किंधा कांड, श्रीरामचरितमानस)
श्रीरामाने सांगितले, ‘‘या वनात एका राक्षसाने (माझी पत्नी) जानकीचे अपहरण केले. हे ब्राह्मणदेव ! आम्ही तिलाच शोधत फिरत आहोत. आम्ही आमचे चरित्र सांगितले, आता हे ब्राह्मण ! तुम्हीही तुमची कथा समजावून सांगा.’’ ‘श्रीराम’ नाव ऐकताच हनुमानाने त्यांना साष्टांग दंडवत घालून प्रणाम केला अन् त्यांची स्तुती केली.
हनुमान म्हणाले, ‘‘हे प्रभु ! मी जो प्रश्न विचारला, तो विचारणे योग्यच होते. वर्षानुवर्षांनंतर तुम्हाला पाहिले, तेही तपस्वी वेषात, मी तर तुमच्या मायेमुळे भ्रमिष्ट झालो आहे; म्हणूनच मी माझ्या स्वामींना ओळखू शकलो नाही. त्यात माझी वानर बुद्धी ! म्हणूनच मी तुम्हाला ओळखू शकलो नाही; पण तुम्ही सर्वज्ञ अंतर्यामी आहात.’’
५. श्रीरामाने हनुमानाला हृदयाशी धरून कवटाळणे आणि ते म्हणजे स्वर्गसुखच असणे
अस कहि परेउ चरन अकुलाई ।
निज तनु प्रगटि प्रीति उर छाई ॥
तब रघुपति उठाई उर लावा ।
निज लोचन जल सींचि जुड़ावा ॥ ३ ॥
(किष्किंधा कांड, श्रीरामचरितमानस)
श्रीरघुनाथाने हनुमानाला उठवून हृदयाशी धरले आणि आपल्या नेत्राश्रूंनी शीतल केले. श्रीरामाने हनुमानाला कवेत घेऊन आश्वस्त केले. युगायुगांचे हे आश्वस्त करणे होते. हनुमानाला प्रेमळ मिठीत घेऊन प्रेमाची ऊब दिली. ही उबदार मिठी सर्व सुख देणारी आणि आश्वस्त करणारी होती. ती अनुभवणे म्हणजे स्वर्गसुखच !
आपण कुणाच्याही आयुष्यात निःशब्दपणे मायेचा वर्षाव करावा. माया, ऊब, प्रेम यांनी सान्निध्यात येणार्यांचे आयुष्य समृद्ध करावे. उबदार, आश्वस्त मिठीसारखे आपण असावे. ती ऊब शब्दांतून, कृतीतून जाणवू द्यावी. भक्तांना आश्वस्त करणारे श्रीराम !
– डॉ. अमिता कुलकर्णी, नवी देहली