मंदिराच्या परिसरात भारतीय वाणिज्य दूतावासाने आयोजित केले होते शिबीर !
ओटावा (कॅनडा) – कॅनडातील ऑन्टारियो शहराच्या स्कारबोरो येथील लक्ष्मी नारायण मंदिराबाहेर खलिस्तान समर्थकांनी भारत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. मंदिराच्या बाहेर निदर्शनाच्या वेळी खलिस्तानी समर्थकांनी खलिस्तानी झेंडे फडकवले आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच ‘मोदी यांची हत्या करा’ ‘निज्जरची हत्या कुणी केली ? भारत सरकारने केली’ अशा घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशानंतरही निदर्शने चालूच होती. न्यायालयाने ‘मंदिराच्या १०० मीटर परिसरात आंदोलन करू नका’, असा आदेश दिलेला असतांना ही निदर्शने करण्यात आली.
भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकारी कॅनडामध्ये रहाणार्या वृद्ध भारतीय नागरिकांना साहाय्य करण्यासाठी वार्षिक शिबिरे घेत असतांना खलिस्तान्यांनी निषेध केला. या शिबिरात ज्येष्ठ भारतीय नागरिकांना जीवन प्रमाणपत्रे दिली जात होती. भारत सरकारकडून निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र एक आवश्यक आणि महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. ही शिबिरे खलिस्तान समर्थकांच्या निशाण्यावर आली आहेत. याद्वारे ते भारत सरकारच्या कामकाजामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी कॅनडामध्ये अनेक ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक शिबिरे रहित करण्यात आली होती.
भारत-कॅनडाचे संबंध अस्थिर करण्याचा प्रयत्न ! – कॅनडाचे पत्रकार डॅनियल बोर्डमॅन
आंदोलनाचे वार्तांकन करणारे ‘नॅशनल टेलिग्राफ’चे पत्रकार डॅनियल बोर्डमॅन यांनी त्याचा एक व्हिडिओ शेअर केला. बोर्डमॅनने म्हटले आहे की, भारत-कॅनडाचे संबंध अस्थिर करणे आणि येथील सामाजिक सलोखा बिघडवणे हा त्यांचा उद्देश आहे. खलिस्तान समर्थक परदेशी शक्तींनी, विशेषतः पाकिस्तान आणि चीन यांच्या मानसिकतेतून अराजकता पसरवण्यासाठी सक्रीयपणे काम करत आहेत. आंदोलकांचे दावे निराधार आहेत. ते मंदिरांसारख्या ठिकाणी हिंसाचार करण्यासाठी चिथावणी देत असल्याने ही कृत्ये धोकादायक आहेत.
संपादकीय भूमिकाकॅनडाच्या न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई न करणारे कॅनडातील सरकार लोकशाहीविरोधीच होत ! अशा सरकारच्या विरोधात कॅनडाची जनता आवाज का उठवत नाही ? |