Bangladesh Stops ISKCON Members : बांगलादेशाने इस्कॉनच्या ६३ सदस्यांना भारत येण्यापासून रोखले !

ढाका (बांगलादेश) – भारतात येणार्‍या इस्कॉनच्या ५० हून अधिक सदस्यांना बांगलादेश प्रशासनाने रोखले. समवेत सर्व वैध कागदपत्रे असूनही इस्कॉनच्या सदस्यांना भारतात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले आहे. इस्कॉनच्या ६३ सदस्यांना बांगलादेशी अधिकार्‍यांनी आंतरराष्ट्रीय सीमेपाशी बेनापोल बंदरावर संशयास्पद हालचालींमुळे रोखले. बांगलादेशातील विविध जिल्ह्यांतील हे सदस्य बेनापोल बंदरावर भारतात प्रवेश करण्यासाठी आले होते; परंतु त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना रोखले.

१. बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितनुसार प्रशासकीय अधिकारी इम्तियाज महंमद अहसानुल म्हणाले की, इस्कॉनच्या सदस्यांना भारतात जाण्याच्या संशयास्पद हेतूंमुळे प्रवासाची अनुमती नाकारण्यात आली.

२. ‘इस्कॉन कोलकाता’चे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या सीमेवर बांगलादेशी पोलिसांनी रोखलेले लोक, हे बांगलादेशाच्या विविध भागांतील इस्कॉनचे सदस्य होते. बांगलादेशातील परिस्थितीमुळे त्यांनी भारतातील तीर्थयात्रेसाठी येण्याचा निर्णय घेतला होता. वैध कागदपत्रे असूनही त्यांना दुसर्‍या देशात जाण्याची अनुमती कशाच्या आधारावर नाकारली जात आहे ?, असा प्रश्‍नही दास यांनी या वेळी उपस्थित केला.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात हिंदूंना छळायचे आणि त्यांपासून कुणी स्वतःचा बचाव होण्यासाठी भारतात यायचे ठरवले, तर त्यांना रोखायचे, ही कुनीती बांगलादेश राबवत आहे. अशा बांगलादेशाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?