Canada Supreme Court : कॅनडातील लक्ष्मीनारायण मंदिराच्या परिसरात खलिस्तान्यांनी फिरकू नये ! – सर्वोच्च न्यायालय, कॅनडा

कॅनडातील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील सर्वोच्च न्यायालयाने टोरंटो येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या १०० मीटरच्या परिसरात खलिस्तानी समर्थकांनी फिरकू नये, असा आदेश दिला आहे. टोरंटोमधील स्कारब्रो क्षेत्रातील लक्ष्मीनारायण मंदिराच्या याचिकेवर न्यायालयाने सांगितले की, मंदिरात भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या शिबिरात आंदोलकांना १०० मीटरच्या परिघात येण्यास मनाई केली जाईल. या परिसरात खलिस्तानी समर्थक आढळल्यास पोलिसांनी त्यांना अटक करावी. हिंसाचाराच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

१. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयाने ७ डिसेंबर या दिवशी मंदिराच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. न्यायालयाचा आदेश सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत लागू रहाणार आहे.

२. या काळात मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयात मंदिराच्या रक्षणासाठी याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. त्याची नोंद घेऊन न्यायालयाने ‘कार्यक्रमाला निमंत्रितांना मंदिरात जाण्यापासून रोखणार्‍या प्रत्येक खलिस्तान्याला दूर करा’, असा आदेश दिला आहे.

संपादकीय भूमिका

वास्तविक कॅनडा सरकार तेथील हिंदूंच्या मंदिरांना सुरक्षा पुरवू शकत नसल्यामुळेच तेथील न्यायालयाला असा आदेश द्यावा लागत आहे, हे लज्जास्पद !