परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे विधान
नवी देहली – टिपू सुलतान भारताच्या इतिहासातील अत्यंत जटील व्यक्तीमत्त्व आहे. भारतावरील ब्रिटीश राजवटीला विरोध करणारी महत्त्वाची व्यक्ती अशी त्याची ख्याती आहे. तसेच त्याचा पराभव आणि मृत्यू भारतीय उपखंडाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे वळण ठरले, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले. ते विक्रम संपत यांनी लिहिलेल्या ‘टिपू सुलतान : द सागा ऑफ द म्हैसूर इंटररेग्नम १७६१-१७९९’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
एस्. जयशंकर पुढे म्हणाले की, म्हैसुरू भागात टिपू सुलतान याच्या राजवटीचा नकारात्मक प्रभावही दिसून आला. म्हैसुरूच्या अनेक भागांत आजही त्याच्याबद्दल खूप चांगली भावना दिसून येत नाही. भारताच्या इतिहासात त्याने इंग्रजांना केलेल्या विरोधावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आणि त्याच्या प्रशासनाच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्व समाजात इतिहास गुंतागुंतीचा असतो. आजचे राजकारण अनेकदा निवडक वस्तूस्थितीमध्येच गुंतलेले असते. टिपू सुलतान प्रकरणातही असेच झाले आहे. राजकीय क्षेत्रातील एक व्यक्ती म्हणून टिपू सुलतान याच्यावरील या पुस्तकात देण्यात आलेल्या माहितीने मी अचंबित झालो.