पुणे – दिवाळीची सुटी आणि विधानसभा निवडणूक यांमुळे रक्तदान शिबिरे न झाल्याने शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा अपुरा असून रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागत आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये केवळ ५ दिवसांचा साठा शिल्लक आहे. विद्यार्थी, तसेच खासगी आस्थापनातील कर्मचारी दिवाळीच्या कालावधीत सुट्यांवर जात असल्याने रक्तदान शिबिरेही अल्प होतात, तसेच यंदा विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात मर्यादा आल्या. शहरात ३५ रक्तपेढ्या असून रुग्णसंख्या अधिक असल्याने दिवसाला सुमारे दीड सहस्र रक्ताच्या पिशव्यांची आवश्यकता भासते. ‘रक्ताचा तुटवडा असल्यामुळे रक्तपेढ्यांनी गृहनिर्माण संस्था, तसेच नियमित रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले आहे’, अशी माहिती ‘जनकल्याण रक्तपेढी’चे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी दिली. रुग्ण संख्या वाढत असल्याने रक्ताची मागणी वाढत आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आगामी काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याने रक्ताचा साठा पुरेशा प्रमाणात वाढेल, असे ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढीचे प्रमुख डॉ. मंगेश सागळे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकासुटी आणि निवडणूक कालावधी पूर्वनियोजित असतांनाही रक्त पिशव्यांची सोय न करणारे रक्तपेढीवाले असंवेदनशीलच होत ! |