पोलिसांकडून म्हमद्या नदाफसह ४ जणांवर गुन्हा नोंद !
सांगली, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – पप्पू फाकडे याच्या हितसंबंधांशी धोका निर्माण झाल्याच्या कारणावरून सांगली येथील गुंड म्हमद्या नदाफ याने १४ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला यामध्ये सलीम मकबूल मुजावर (वय ४२ वर्षे, रा. गणेशनगर) हा घायाळ झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी महंमद जमाल नदाफ, इम्रान दानवडे, पप्पू फाकडे, फारूख मुस्ताफ नदाफ यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. फाकडे आणि दानवडे पसार झाले आहेत.
म्हमद्याच्या टोळीतील इम्रान दानवडे याचे पप्पू फाकडे याच्याशी आर्थिक हितसंबंध आहेत, तर घायाळ सलीम याचे अजय माने याच्याशी आर्थिक हितसंबंध आहेत. फाकडे आणि दानवडे यांच्या आर्थिक संबंधास सलीम याच्यामुळे धोका निर्माण झाल्याचा संशय म्हमद्यासह अन्य संशयितांना होता. म्हमद्या नदाफ याला मकोका खटल्यात जामीन मान्य करतांना महाराष्ट्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य सीमांवर पडताळणी नाके असतांनाही हद्दपार असणारा गुंड म्हमद्या नदाफ याने गोळीबार केला आहे. (गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी पोलिसांच्याही पुढे आहेत, असेच म्हणावे लागेल. हे पोलिसांचे अपयश नव्हे का ? – संपादक)