४४ सेकंदांत १२ रॉकेट डागण्याची क्षमता !
नवी देहली – भारताच्या ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनाईझेशन’ने (डी.आर्.डी.ओ.ने) ‘पिनाक’ रॉकेट लाँचरची (रॉकेट डागणार्या यंत्रणेची) यशस्वी चाचणी केली. ही यंत्रणा स्वदेशी आहे. ही यंत्रणा अवघ्या ४४ सेकंदांत १२ रॉकेट डागू शकते. त्याची अचूकता आणि एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर आक्रमण करण्याची क्षमता तपासण्यात आली. ‘पिनाक’ नाव भगवान महादेवाच्या ‘पिनाक’ धनुष्यावरून ठेवण्यात आले आहे.
१. ही चाचणी ३ वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आली. २ लाँचर्समधून एकूण २४ रॉकेट डागण्यात आले. हे सर्व रॉकेट त्यांच्या लक्ष्यांवर यशस्वीपणे मारा करण्यात यशस्वी झाले.
२. या यशाविषयी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डी.आर्.डी.ओ. आणि सैन्यदल यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, या नवीन प्रणालीच्या समावेशामुळे आपले सैन्यदल अधिक सक्षम होईल.
३. ही यंत्रणा सिद्ध करण्यामध्ये ‘मुनिशन इंडिया लिमिटेड’ आणि ‘टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स’ यांनी महत्त्वाचा हातभार लावला. डी.आर्.डी.ओ.चे प्रमुख समीर कामत यांनीही या यशाविषयी आनंद व्यक्त करत यंत्रणा आता सैन्यात भरती होण्यासाठी सज्ज झाल्याचे सांगितले.