श्रवण आणि ऐकणे यांमुळे माणूस विद्वान होतो !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

 प्रश्न : केन स्वित् श्रोत्रियो भवति ?

उत्तर : श्रुतेन.

प्रश्न : कशामुळे विद्वान होतो ?

उत्तर : श्रवण आणि ऐकणे यांमुळे.

 विद्वता संपादण्यासाठी गंभीरतेने श्रवण-वाचन हवे !

‘श्रवण’ हे विद्वत्ता संपादनाचे साधन आहे. पूर्वीच्या काळी मुद्रणालये नसल्यामुळे पुस्तके-ग्रंथ ही वस्तू फार दुर्मिळ होती. त्यामुळे ‘ज्ञान’ हे ऐकूनच मिळवावे लागत असे. आज मुद्रणाच्या सुलभतेमुळे पुस्तके वाचूनही विद्वत्ता संपादन करणे शक्य आहे. पूर्वी विद्वत्ता सांगतांना एखाद्याला ‘बहुश्रुत, पुष्कळ ऐकलेला’, असे म्हणण्याची पद्धत होती. या श्रवणाच्या मागे चिंतन-मनन-निदिध्यासन आहे, हे गृहीत धरलेले आहे. विद्वत्ता संपादन करायची असेल, तर पुष्कळ वाचले आणि ऐकले पाहिजे; पण हे ऐकणे-वाचणे केवळ ललित विषयांचे नसावे. गंभीर आणि तात्त्विक विषयांसंबंधीचे श्रवण-वाचन विपुल प्रमाणात झाले आणि केले पाहिजे. ललित ‍विषयांचे स्थान जेवणातील चटणी-मिठासारखे असावे; पण खेदाची गोष्ट अशी की, आज जे काय वाचन-श्रवण होत असते, ते बहुधा मनोरंजन आणि करमणूक यांकरता होते.

ज्ञानार्जनाची ओढ अपवादासारखी राहिली आहे. माणसे वृत्तपत्रे वाचतात; पण त्यातील अग्रलेख वाचणारे किती ? आणि वाचण्यासारखे अग्रलेख किती ? ‘विद्वत्ता प्राप्त होणे वा न होणे’, हे प्रकृती-परिस्थितीवर पुष्कळसे अवलंबून आहे. विद्वत्ता मिळवण्याची ओढच नसणे आणि विद्वान होण्याचे आकर्षण नसणे, हे लक्षण काही चांगले नाही. तरुण पिढीने हे लक्षात घेणे फार आवश्यक आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)