‘एकदा योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या खोलीच्या दाराला आतून कडी लावली होती. त्या वेळी एका साधकाला योगतज्ञ दादाजींना तातडीने काहीतरी विचारायचे होते. त्या साधकाने एका कागदावर ‘प.पू. दादाजी केवळ २ मिनिटे काम आहे’, असा निरोप लिहून तो कागद त्यांच्या खोलीचे दार न वाजवता दाराच्या खालच्या फटीतून आतील बाजूला सरकवला.
तो कागद पाहिल्यानंतर योगतज्ञ दादाजी यांनी त्या कागदावर साधकाने लिहिलेल्या निरोपाच्या खाली लिहिले, ‘असे बोल खोटे पडतात; म्हणून थोडा वेळ काम आहे’, असे म्हणा.’ काही वेळाने मी योगतज्ञ दादाजी यांच्या खोलीत गेलो. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘काहीजण २ मिनिटांसाठी भेट हवी’’, असे सांगतात, तरीही ते वेळेचे भान न ठेवता बोलतच रहातात. काही जण सांगतात, ‘‘आम्ही संध्याकाळी ५ वाजल्यानंतर येतो’’; पण ते ६ वाजून गेल्यानंतरही येत नाहीत. साधक अशा प्रकारे असत्य बोलले, तर ते पुण्यमय शिदोरीत जमा होत नाही. साधकांनी नेहमी सत्य बोलावे. सात्त्विक वृत्तीच्या साधकांनी प्रगती करण्यासाठी सत्याचा बोध घ्यावा.’’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२४)