संतांनी साधकाला ठराविक कालावधीसाठी सांगितलेला नामजप त्याने काही कारणास्तव अधिक वेळ केल्यास त्याला लाभच होत असणे

 ‘संत विशिष्ट कारणांसाठी साधकांना प्रतिदिन विशिष्ट कालावधीसाठी नामजप करण्यास सांगतात. ‘संतांचे आज्ञापालन म्हणून त्यांनी जितका काळ साधकाला नामजप करण्यास सांगितला आहे, तितकाच करावा. साधकाने स्वतःच्या मनाने त्याचा कालावधी अल्प-अधिक करू नये; कारण त्या कालावधीसाठी संतांचा संकल्प झालेला असतो’, असे सांगितले जाते; पण काही वेळा साधक संतांनी सांगितलेला नामजप करतांना ‘या कालावधीत मनात इतर विचार आले किंवा नामजप भावपूर्ण झाला नाही’, या विचाराने ताे वेळ भरून काढण्यासाठी अधिक वेळ नामजप करतात. ‘असे करणे योग्य आहे कि अयोग्य ? यामध्ये लाभ आणि हानी कशा प्रकारे होते ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. संतांनी विशिष्ट कालावधीसाठी सांगितलेला नामजप केल्याने साधकाला होणारे लाभ

श्री. राम होनप

१ अ. संतांनी सांगितलेल्या नामजपात ‘संपुटित शक्ती’ असणे : ‘संपुटित’ यांतील ‘सं’ या शब्दाचा अर्थ ‘संतांचा साधकाच्या कल्याणाचा विचार आणि ईश्वरी शक्ती.’ ‘पुटित’ म्हणजे ‘एकत्रित’. संत साधकाला विशिष्ट अडचण सुटण्यासाठी विशिष्ट नामजप करायला सांगतात. तेव्हा त्या नामजपाला ‘संतांचा साधकाच्या कल्याणाचा विचार आणि ईश्वरी शक्ती’ जोडलेली असते. त्यामुळे संतांनी सांगितलेला नामजप संपुटित शक्तीने युक्त असतो.

संतांनी साधकाला विशिष्ट वेळ आणि विशिष्ट कालावधीसाठी जप सांगितलेला असतो. तो संख्यात्मक, भावपूर्ण आणि एकाग्रतेने होणे महत्त्वाचे असते. असा जप केल्याने साधकाला संतांच्या नामजपाचा पूर्णतः लाभ होतो.

१ आ. संतांच्या नामजपाने साधकात ‘संपात-क्रिया’ आणि ‘उन्मपात-क्रिया’ घडत असणे

१ आ १. ‘संपात-क्रिया म्हणजे काय ?’ : ‘सं’ म्हणजे ‘ईश्वरी शक्ती’ आणि ‘पात’ म्हणजे ‘दीक्षा’ किंवा ‘देणे’. संत विशिष्ट नामजपाच्या माध्यमातून साधकाला ईश्वरी शक्ती देत असतात. याला ‘संपात-क्रिया’, असे म्हटले आहे.

१ आ १ अ. ‘संपात’, या शब्दाचे टप्प्याटप्प्याने पालटत जाणारे स्वरूप आणि अर्थ : प्राचीन काळी सर्वप्रथम ‘संपात’, हा शब्द प्रचलित होता. त्यानंतर या शब्दात पालट होऊन ‘संपदा’, हा शब्द रूढ झाला. संपदा म्हणजे ‘गुण’. नंतर ‘संपदा’ या शब्दाचे रूपांतर ‘संपत्ती’, म्हणजे ‘अभिवृद्धी’, असे झाले. भाषेत ‘कालखंड’ आणि ‘शब्दाचा उपयोग’ यांनुसार मूळ शब्दामध्ये टप्प्याटप्प्याने पालट होत जातो. कालचक्रात काही अंतराने टप्प्याटप्याने मोठे पालट होत जातात. त्याला ‘कालखंड’, असे म्हटले आहे.

१ आ २. उन्मपात-क्रिया : याचा अर्थ ‘काढून घेणे’, असा होतो. संत साधकाला नामजप सांगून त्याच्यातील अशुद्धी काढून टाकतात. याला ‘उन्मपात-क्रिया’, असे म्हटले आहे.

१ इ. संतांनी दिलेल्या जपाने साधकाची ‘उन्मयन क्रिया’ घडत असणे

१ इ १. ‘उन्मयन क्रिया’ म्हणजे काय ? : ‘उन्म’ याचा अर्थ ‘जोडला जाणे’ आणि ‘यन’ हा शब्द ‘कार्य होणे’, असा आहे. संतांनी साधकाला सांगितलेल्या नामजपात पुष्कळ ईश्वरी शक्ती असते. त्यामुळे ‘साधक त्या नामाने ईश्वराशी लवकर जोडला जाणे आणि त्याच्या साधनेतील अडथळे वेगाने न्यून होणे’, यांसाठी साहाय्य होते. या प्रक्रियेला साधकाची ‘उन्मयन क्रिया’, असे म्हटले आहे.

१ ई. चित्तातून कर्मदोष बाहेर पडणे : साधकाला काही प्रसंगी चालू किंवा मागील जन्मांतील चुकीच्या कर्मांमुळे काही शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक पीडा भोगाव्या लागतात. संत साधकाला साधनेतील विशिष्ट अडथळा दूर होण्यासाठी नामजप सांगतात. या नामाद्वारे त्या अडथळ्यामागे साधकाचा एखादा कर्मदोष असेल, तर त्यावर आघात होतो. तेव्हा तो कर्मदोष प्रगट होऊन रौद्ररूप धारण करतो. त्यामुळे साधकाला जप करतांना विविध शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होऊ लागतात. साधक चिकाटीने नामजप करत राहिल्यास या कर्मदोषाचा जोर हळूहळू न्यून होऊ लागतो. परिणामी साधकाला साधना करणे सुलभ होते.

२. संतांनी साधकाला सांगितलेल्या नामजपात येणारे अडथळे

२ अ. मनाच्या संघर्षात पुष्कळ वाढ होणे : नामात मुळातच ईश्वरी शक्ती असते. संतांनी साधकाला सांगितलेल्या नामात संतांचीही ईश्वरी शक्ती समाविष्ट असते. त्यामुळे जेव्हा साधक संतांनी सांगितलेला नामजप करतो, तेव्हा त्याच्या मनाची शुद्धी वेगाने होऊ लागते. त्यामुळे त्या साधकाच्या चित्तातील स्वभावदोष आणि अहं यांनी युक्त विचार जागृत अवस्थेत येऊन बाहेर पडू लागतात. तेव्हा नामजप करतांना साधकाच्या मनाच्या संघर्षात वाढ होते. त्यातून साधकाच्या मनाच्या शुद्धीची प्रक्रिया घडत असते.

२ आ. अनिष्ट शक्तींची सूक्ष्मातून आक्रमणे होणे : जेव्हा आध्यात्मिक त्रास असलेला साधक संतांनी सांगितलेल्या नामजपास आरंभ करतो, तेव्हा अनिष्ट शक्ती त्याच्या नामजपात अडथळे निर्माण करते, उदा. मन अस्थिर होणे, अकस्मात् भीती वाटणे, विनाकारण राग येणे, चित्तातील सर्वांत दुःखदायी किंवा क्लेषदायक घटना जागृत होणे, मन विचलित करणारी दृश्ये दिसणे, अकस्मात् शारीरिक वेदना चालू होणे, ग्लानी येणे आणि काही न सुचणे इत्यादी.

‘साधकाने संतांनी सांगितलेला जप पूर्ण केल्यास स्वतःची शक्ती न्यून होईल’, हे अनिष्ट शक्तीला ठाऊक असते. त्यामुळे अनिष्ट शक्ती साधकाच्या जपात विघ्ने आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्नशील असते.

३. संतांनी दिलेला विशिष्ट जप परिणामकारक न झाल्याने तो अधिक वेळ केल्यास साधकाला संत आणि ईश्वर यांचा आशीर्वाद प्राप्त होत असणे

वरील सर्व कारणांमुळे संतांनी सांगितलेला विशिष्ट नामजप पूर्ण करतांना साधकाला असंख्य अडथळे येतात. त्यामुळे संतांनी विशिष्ट कालावधीसाठी सांगितलेला जप पूर्ण केल्यावर साधकाने आणखी काही वेळ जप केल्यास त्याची कुठलीही हानी होत नाही; उलट त्याला आध्यात्मिक लाभच होतो, तसेच अनेक अडथळे पार करून साधकाने यथाशक्ती जप पूर्ण केल्याने संत आणि ईश्वर यांचा त्याला आशीर्वादही प्राप्त होतो.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.७.२०२४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.