(‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी यंत्रणा आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेच्या द्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकुल बनवली जातात.)
वर्ष १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे भाषण केले आणि त्यानंतर अमेरिकेसह अन्य देशांतही प्रवास केला. तेथे स्वामीजींनी अनेकदा सांगितले, ‘ते कुणाचेही धर्मांतर करण्यासाठी आले नाहीत, हिंदूंचा वेदांत ख्रिस्त्यांना अधिक चांगला ख्रिस्ती बनवेल.’ जगातील सर्वांत प्राचीन धर्मग्रंथ मानल्या जाणार्या हिंदूंच्या ‘ऋग्वेदा’त म्हटले आहे, ‘एकम सत् विप्रा बहुधा वदन्ति’ अर्थात् सत्य एकच आहे, ज्याला ज्ञानी विविध प्रकारे व्यक्त करतात.’ अशाच प्रकारे ‘महोपनिषदा’त म्हटले आहे, ‘उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ।’, म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरील रहाणारे नागरिक म्हणजे एक कुटुंबच आहे.’ त्यामुळे भारताने जगभरात जरी हिंदु धर्म सांगितला, तरी त्यामागे पाश्चिमात्यांचे धर्मांतर करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. या तुलनेत अन्य धर्मांची (खरे तर पंथांची) आपल्या पंथविस्ताराची, स्वर्गप्राप्तीसाठीची इच्छा आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन अन्य धर्मियांवर अमानुष अत्याचार करण्याचा इतिहास भारताला नवीन नाही. जगातील विविध धर्मांचा प्रत्यक्ष अभ्यास केलेल्या स्वामी विवेकानंद यांनी भारतात चालू असणार्या धर्मांतराचे संकट ओळखून म्हटले आहे, ‘हिंदूचे धर्मांतर, म्हणजे हिंदु धर्मातील केवळ एक हिंदू न्यून होणे इतकेच नव्हे, तर हिंदु धर्माच्या एका शत्रूची वाढ होणे आहे. धर्मांतरामुळे हिंदू अल्पसंख्य झालेल्या काश्मीर, मणीपूर, नागालँड ही भारतातील राज्ये आणि पाकिस्तान, बांगलादेश आदी ठिकाणी आजही आपण हे प्रत्यक्ष अनुभवत आहोत. आज देशभरात भारतविरोधी फुटीरतावादी चळवळी चालू झाल्या आहेत आणि त्यांना बळ देण्याचे कार्य या धर्मांतर करणार्या संघटनांकडून चालू आहे. त्यांना संरक्षण देण्याचे कार्य स्वतःला ‘सेक्युलर’वादी (निधर्मी) म्हणवणार्या राजकारण्यांकडून केले जात आहे. त्यामुळेच वरवर दिसणार्या धर्मांतराच्या मागे ‘डीप स्टेट’ आहे, असा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. या लेखातून आपल्याला हे निश्चितच लक्षात येईल.
श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१. चर्चच्या प्रभावाखाली ख्रिस्ती देशांचे पंथविस्तारासाठी जगभरातील देशांवर आक्रमण आणि तेथील मूळ संस्कृती नष्ट करणे
आज आपल्याला महाविद्यालयांतील पाठ्यपुस्तकांत पोर्तुगीज, ब्रिटीश, फ्रेंच आदी भारतात व्यापारासाठी आल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात त्यामागील खरे कारण ख्रिस्ती पंथाचा प्रसार होते, याचा उल्लेखही केला जात नाही. इ.स. १४०० च्या प्रारंभी युरोपातील देशांत राज्यविस्ताराचा विचार प्रबळ झाला. त्या काळात युरोपातील बहुतांश राजे चर्चच्या प्रभावाखाली कार्य करत असल्याने आणि पोपची अर्थात् चर्चची या राज्यविस्ताराला आणि त्याद्वारे पंथविस्ताराला अनुमती असल्याने राजांनाही या कामात खलाशांना धन, सुविधा द्यावे लागत होते. त्यामुळे युरोपातील देशांनी समुद्रमार्गाने अन्य देशांपर्यंतचा मार्ग शोधण्यास प्रारंभ केला. नवीन व्यापारी मार्ग शोधण्याची स्पर्धा, ख्रिस्ती पंथाचा प्रसार करण्याचा उद्देश आणि प्रगत नौकानयन यांमुळे त्यांना हे शोध घेणे शक्य झाले.
वर्ष १४८८ मध्ये बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी पूर्वेकडे निघाला. वर्ष १४९२ मध्ये स्पेनचा खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस पश्चिमेकडे निघाला आणि त्याने चुकून पूर्वेकडील कॅरिबियन प्रदेश गाठला. पोर्तुगिजांना शंका होती की, कोलंबसने ज्या भूमीवर दावा केला होता, तेथे पोर्तुगीज खलाशी प्रथम पोचले असावेत. त्यामुळे यातून त्या भूमीवर मालकी हक्काचा वाद उत्पन्न झाला आणि हे शत्रूत्व काही वर्षांत अधिकच वाढले. यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन पोपने स्पेन आणि पोर्तुगाल यांच्या राजांना सामंजस्य करार करण्याचे सुचवले. त्यानुसार वर्ष १४९४ मध्ये पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात ‘टॉर्डेसिलस’ करारावर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामध्ये एका काल्पनिक रेषेद्वारे जगाचे २ महासत्तांमध्ये विभाजन करण्यात आले. ही काल्पनिक रेषा अटलांटिक महासागरामध्ये होती. त्या रेषेच्या पूर्वेकडील सर्व भूमींवर पोर्तुगालने दावा केला होता, तर त्या रेषेच्या पश्चिमेकडील सर्व भूमींवर स्पेनचा दावा होता. या करारात ‘नवीन शोधलेल्या भूमीतील ज्या देशांत ख्रिस्ती राज्य नाही, तेथे आक्रमण करून ती भूमी कह्यात घ्यावी’, असा निर्णय पोपने परस्परच जाहीर केला. त्यामुळे अमेरिका, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, मेक्सिको यांसह अन्य देशांतील इंका, टायनो, रेड इंडियन आणि एझ्टेक यांसारख्या मूळ प्राचीन संस्कृती नष्ट करण्यात आल्या. आज तेथे केवळ ख्रिस्ती चर्चचा प्रभाव शिल्लक राहिला आहे.
वर्ष १४९८ मध्ये जेव्हा वास्को द गामाने केप ऑफ गुड होपवरून हिंदी महासागरात प्रवेश केला, तेव्हा पोर्तुगिजांना अचानकपणे आफ्रिकन, भारतीय आणि अरब या देशांचा समावेश असलेल्या व्यापार जाळ्यामध्ये प्रवेश मिळाला. वास्को द गामाने भारतातून पुढे पूर्वेकडील इंडोनेशिया आणि जपान या देशांकडे मार्गक्रमण केले; मात्र अमेरिका, आफ्रिका या देशांच्या तुलनेत पूर्वेकडील राज्ये अगोदरच सामर्थ्यशाली होती. चीन-जपानचे सम्राट, भारतातील मराठे राज्यकर्ते, दक्षिण भारतातील पांडियन, विजयनगर साम्राज्य आणि मलेशियाचे सुलतान यांच्यामुळे पोर्तुगिजांना या भागांत स्पेनप्रमाणे निरंकुश सत्ता मिळाली नाही. पुढे या मार्गातील व्यापाराचा लाभ लक्षात घेऊन
१५ व्या शतकाच्या शेवटी युरोपातील नेदरलँड्स, इंग्लंड, फ्रान्स आदी देशांनीही शक्तीशाली नौदल बनवून तेही या स्पर्धेत उतरले आणि त्यांनी पोर्तुगीज-स्पॅनिश वसाहतींवर आक्रमण केले अन् टॉर्डेसिलसचा तह मोडित निघाला.
२. व्यापारासह ख्रिस्तीकरण करण्यासाठी प्रयत्न
पूर्वेकडील देशांत स्वतःच्या वसाहती निर्माण करण्यासह तेथील लोकांचे धर्मांतर करणे, हे पोर्तुगीज राजांनीही स्वतःचे पवित्र कर्तव्य मानले. त्यामुळे त्यांनी तेथे चर्चच्या स्थापनेसाठी पैसे दिले. पोप निकोलस पाचवा याने वर्ष १४५२ मध्ये अधिकृत आदेश जारी केला, ‘सर्व गैर-ख्रिस्ती लोकांविरुद्ध युद्ध करून त्यांच्या प्रदेशांवर विजय मिळवणे अधिकृत असेल. गैर-ख्रिस्ती लोक हे असंस्कृत आणि अमानवी लोक असल्याने त्यांचा भूमी किंवा राष्ट्र यांवर कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांच्या भूमीचा ताबा घेण्याचा अधिकार देवाने ख्रिस्त्यांकडे दिलेला आहे.’ पोपच्या या आदेशाचा उपयोग अन्य प्रदेशांत कारणाशिवाय युद्ध, वसाहतवाद, तेथील मूळनिवासींचा नरसंहार आणि गुलामगिरीचे समर्थन करण्यासाठी केला. चर्च आणि पोप यांच्या या आदेशाचा वापर करून पोर्तुगीज, स्पॅनिश, तसेच ब्रिटीश सत्ता यांनी अमानवीय गुन्हे केले !
पोपच्या आदेशात म्हटले होते, ‘शोधलेल्या नवीन भूमीतील मूळ रहिवासी यांना वश करून आपल्या श्रद्धेत आणण्याचा प्रयत्न करा.’ याचाच अर्थ होतो की, त्यांचे धर्मांतर करून त्यांच्या आधारे ‘ख्रिस्ती साम्राज्य’ निर्माण करा. यातून स्पष्ट होते की, पाश्चिमात्य देशांचे भारतात आगमन केवळ व्यापारासाठी नव्हते, तर ते त्यांच्या धर्मगुरूंच्या ‘बळकावलेल्या भूमीतील संस्कृती, धर्म नष्ट करून तेथे ख्रिस्ती पंथ स्थापन करणे’, या आदेशाचे पालन करण्यासाठी आले होते.
त्यानंतर फ्रान्सिस झेवियर, ज्याला नंतर सेंट झेवियर म्हणून ओळखले जाऊ लागले, तो वर्ष १५४२ मध्ये गोव्यात आला आणि त्याने धर्मांतरासाठी गोव्यातही इन्क्विझिशनचा (धर्मसमीक्षण सभांचा) पाया घातला. त्यात सहस्रो नव्हे, तर लाखो ज्यू, मुसलमान, हिंदु आणि नवख्रिस्ती यांचा अमानुष छळ करण्यात आला.
८.२.१५४५ या दिवशी ‘सोसायटी ऑफ जिझस’ या संस्थेला लिहिलेल्या पत्रात फ्रान्सिस झेवियर मलबारच्या किनार्यावर झालेल्या धर्मांतराचे वर्णन करतो, ‘बाप्तिस्मा घेतल्यानंतर हे नवख्रिस्ती आपापल्या घरी जातात आणि बायका, मुले सार्या परिवाराला घेऊन पुन्हा येतात अन् त्यांनाही बाप्तिस्मा घ्यायला लावतात. त्यानंतर मी त्यांना खोट्या देवांची देवळे पाडण्याचा आणि मूर्तीचे भंजन करण्याचा हुकूम देतो. ज्या मूर्तीची या लोकांनी पूजा केली, त्यांच्याचकडून त्या मूर्तींचा भंग करवतांना आणि त्यांची मंदिरे पाडतांनाचे दृश्य बघतांना मला किती आनंद होतो, याचे शब्दांनी वर्णन करता येत नाही.’
फ्रान्सिस झेवियरचे हे सर्व धर्मांतर पोर्तुगीज सत्ता आणि ख्रिस्ती पंथाचा प्रभाव वाढवण्यासाठी होते. २० जानेवारी १५४८ या दिवशी कोचीनहून लिहिलेल्या पत्रात त्याचा प्रांजळ कबुलीजबाब आढळतो. तो म्हणतो, ‘शासनाच्या सक्रीय साहाय्याविना भारतियांना कॅथॉलिक धर्मात आणणे शक्यच झाले नसते.’ राज्याचा विस्तार करण्यासाठी तो धर्मांतराचा उपयोग करत होता, तीच राज्यविस्ताराची पद्धत आजच्या लोकशाहीतही धर्मांतराच्या आधारे वापरली जात आहे. (२३.१०.२०२४)
(क्रमशः पुढच्या रविवारी)
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दीपावली विशेषांक)