पणजी, १ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात आयात होणार्या भाजीपाल्याच्या वाहनातून गोमांस लपवून आणले जात असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. गोव्यात आणल्या जात असलेल्या भाजीपाल्याच्या गोण्यांखाली १० टन गोमांस लपवलेले वाहन नुकतेच तिलारी घाटात जागरूक हिंदूंनी पकडले होते. या पार्श्वभूमीवर काणकोण येथील हिंदवी स्वराज्य संघटनेने गोव्यात आयात होणार्या भाजीपाल्याच्या वाहनांतून गोमांस लपवून आणले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि गोव्यात येणार्या भाजीपाल्याच्या वाहनांची तपासणी तपासनाक्यांवर करावी, अशी मागणी येथील पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
ख्रिस्ती नागरिक २ नोव्हेंबर या दिवशी सर्वत्र पूर्वजांच्या स्मरणार्थ प्रतिवर्ष ‘ऑल सोल्स डे’ साजरा करतात. या वेळी गोमांसासाठी माेठी मागणी असते. ख्रिस्ती समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मिलाग्रीस फर्नांडिस यांनी या प्रकरणी सरकारकडे ‘ऑल सोल्स डे’ला ख्रिस्त्यांना गोमांस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या सणाला गोमांस हा महत्त्वाचा पदार्थ असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्य संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले आहे. याविषयी अधिक माहिती देतांना हिंदवी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘तिलारी येथे भाजीच्या वाहनातून गोमांस लपवून आणल्याची घटना घडली आहे. काणकोण येथे कर्नाटक येथून शनिवारच्या आठवड्याच्या बाजारात अशा प्रकारची भाजी आणली जाऊ नये. गोमाता हे आमचे दैवत आहे. गोमातेची हत्या करण्याच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. येथील वातावरण बिघडण्यास देऊ नये. अवैधरित्या रात्रीच्या वेळी असे प्रकार घडत असतात. याविषयी पंचायत आणि पालिका क्षेत्रात जागृती केली जाणार आहे.’’