दिवाळी का साजरी केली जाते ?

दिवाळी का साजरी केली जाते ?, याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. प्रभु श्रीराम वनवासातून परतल्यावर अयोध्येत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि आनंदाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते; पण या व्यतिरिक्तही अशा अनेक कथा आहेत, ज्या फार अल्प लोकांना ठाऊक आहेत. केवळ इतकेच नाही, तर दिवाळी साजरी करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. महाभारतात पांडव वनवासातून परतले. महाभारतातच श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि १६ सहस्र गोपिकांची सुटका केली. तेव्हाही दिवाळी साजरी करण्यात आली होती. दिवाळी साजरी करण्यामागील अशा अन्य कोणत्या कथा आहेत, ते पाहूया.

प्रभु श्रीराम वनवासातून परत आले तो क्षण

१. श्रीरामाचा वनवास संपला !

धार्मिक ग्रंथांनुसार आश्विन मासाच्या अमावास्येच्या दिवशी भगवान श्रीराम १४ वर्षांचा वनवास पूर्ण करून त्यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या शहरात परतले. या वेळी संपूर्ण अयोध्येतील जनतेने दीपोत्सवाचे आयोजन करून प्रभु श्रीरामाचे स्वागत केले. तेव्हापासून प्रतिवर्षी आश्विन मासातील अमावास्या तिथीला दिवाळी सण त्याच उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने घरे, तसेच आजूबाजूची ठिकाणेही रोषणाईने सजवली जातात.

२. पांडव राज्यात परतले !

महाभारत काळात कौरवांनी शकुनी मामाच्या साहाय्याने पांडवांना द्युत खेळात पराभूत केले आणि कपटाने त्यांच्याकडून सर्व काही काढून घेतले. यानंतर पांडवांना राज्य सोडून १३ वर्षांसाठी वनवासात जावे लागले. आश्विन अमावास्येच्या दिवशी ५ पांडव (युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव) १३ वर्षांचा वनवास संपवून त्यांच्या राज्यात परतले. त्यांच्या परतीचा आनंद साजरा करण्यासाठी राज्यातील जनतेने दिवे लावले. तेव्हापासून आश्विन अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते, असे मानले जाते.

३. राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक

राजा विक्रमादित्य प्राचीन भारताचे महान सम्राट आणि आदर्श राजा होते. आश्विन अमावास्येला त्यांचा राज्याभिषेक झाला, असे म्हणतात. तेव्हापासून त्याच्या स्मरणार्थ दिवाळी हा सण साजरा केला जातो.

४. देवी लक्ष्मीचा अवतार होणे !

पौराणिक मान्यतेनुसार आश्विन मासाच्या अमावास्येच्या दिवशी दिवाळी सण साजरा केला जातो. असे म्हणतात की, या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीचा अवतार झाला होता. माता लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धी यांची देवी मानली जाते. त्यामुळे प्रत्येक घरात दिवा लावण्यासह देवी लक्ष्मीची पूजाही केली जाते.

५. सहाव्या शीख गुरूंचा स्वातंत्र्यदिन !

शीख समाजातील लोक त्यांचे सहावे गुरु श्री हरगोविंदजी यांच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी करतात. मोगल सम्राट जहांगीरच्या बंदिवासात गुरु श्री हरगोविंदजी ग्वाल्हेर तुरुंगात होते. तेथून सुटका झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तेव्हापासून या दिवशी दिवाळी सण साजरा केला जातो.

६. नरकासुर वध

प्राग्ज्योतिषपूर नगरीचा राजा नरकासुर नावाचा राक्षस होता. त्याने त्याच्या सामर्थ्याने इंद्र, वरुण, अग्नि, वायू इत्यादी सर्व देव आणि साधू यांना त्रास देऊ लागला. त्याने १६ सहस्र महिलांनाही कह्यात घेतले. जेव्हा त्याचे अत्याचार पुष्कळ वाढले, तेव्हा देव आणि ऋषी यांनी भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेतला. भगवान श्रीकृष्णाने त्यांना नरकासुरापासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले; पण नरकासुराला एका स्त्रीच्या हातून मरण्याचा शाप मिळाला होता; म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्याची पत्नी सत्यभामाला त्याचे सारथी बनवले आणि तिच्या साहाय्याने नरकासुराचा वध केला. अशा रितीने आश्विन मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून देव आणि ऋषिमुनी यांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. तेव्हापासून ‘नरकचतुर्दशी’ आणि ‘दिवाळी’ हे सण साजरे होऊ लागला.

– पूजा कारंडे-कदम (साभार : दैनिक ‘सकाळ’)