‘जाती व्यवस्था वाईट आहे’, असे म्हणणारेच ती व्यवस्था जोपासत आहेत ! – Vishwaprasanna Tirtha Swamiji

पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी काँग्रेसचे आमदार बी.के. हरिप्रसाद यांना सुनावले

पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी व काँग्रेसचे आमदार बी.के. हरिप्रसाद

मंगळुरू (कर्नाटक) – ‘जाती व्यवस्था वाईट आहे’, असे म्हणणारेच ती व्यवस्था जोपासत आहेत. एकीकडे ते ‘आम्ही जातिविरहित आहोत’ असे म्हणतात, तर दुसरीकडे  सगळ्या क्षेत्रांमध्ये ती व्यवस्था जोपासतात, अशी अप्रत्यक्ष टीका पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी काँग्रेसचे आमदार बी.के. हरिप्रसाद यांच्या विरोधात  केली. ‘जाती गणनेच्या संदर्भात स्वामीजी क्षुल्लक राजकारण्यांसारख्या भूमिका घेत आहेत’, असे आमदार बी.के. हरिप्रसाद म्हणाले होते. याच विधानाचा संदर्भ घेत येथील कुळायी चित्रापूर मठात झालेल्या धर्मसभेत पेजावर स्वामीजी यांनी हरिप्रसाद यांच्या विधानाला उत्तर दिले.

पेजावर स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘आम्ही कुणालाही बोलावून ‘असे करा’ असे म्हटलेले नाही. लोकांनी आमच्याकडे येऊन ‘तुमचे मत काय आहे ?’ असे विचारले. ‘जातिविरहित असल्याचे सांगतांनाच जाती गटांचे गणित कशाला?’, असे आमचे मत होते. असे म्हणणे म्हणजे क्षुद्र राजकारण आहे. ‘आम्ही सांगितलेले चुकले’, असे ते म्हणतात; मग हा लोकशाहीवादी देश आहे कि नाही ? हे तुम्हीच ठरवा. म्हणजे समाजात बोलण्याचा अधिकार केवळ राजकारण्यांना आहे का ? सामान्य जनतेलाही नाही का ? ‘लोकशाही संपली आहे, आता राजकारण्यांचे राज्य आहे’, असे त्यांना म्हणायचे आहे का? लोकशाही देशात केवळ मठाधिपतीलाच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेलाही स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार असायला नको का ?’’