आचारसंहिता भंग केल्याचाही ठपका
अहिल्यानगर – संगमनेरमधील वादग्रस्त प्रकरणात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांसह ५० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणात २ वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. वाहनांची हानी करून विखे समर्थकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी ५० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. जयश्री थोरात यांच्यावर वादग्रस्त टीका झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी दिरंगाई झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. या प्रकरणी त्यांच्यावर आचारसंहिता असतांना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जयश्री थोरात यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे संगमनेरमध्ये जाळपोळ झाली. काही ठिकाणी गाड्यांची फोडाफोडीही करण्यात आली. जयश्री थोरात यांच्यावर सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराच्या वेळी आणि त्यांच्या समक्ष टीका करण्यात आली. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या विरोधात थोरात समर्थक आक्रमक झाले. सुजय विखे पाटील यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सुजय विखे पाटील केला होता. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह महिला भगिनींविरुद्ध अत्यंत गलीच्छ भाषेत वक्तव्य करणार्या वसंत देशमुख आणि सुजय विखे यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी सहस्रो नागरिक रस्त्यावर उतरले.