साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘वर्ष २००६ – २००७ मध्ये उत्तरदायित्व असणार्‍या साधकांसाठी शिबिरे घेतली जायची. त्या वेळी माझ्याकडे दायित्वाची सेवा होती. तेव्हा देवद आश्रमात घेतलेल्या एका शिबिराला जाण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची साधक घडवण्यासाठी असलेली तळमळ आणि त्यांची साधकांवरील प्रीती मी स्वतः अनुभवली. त्या संदर्भातील काही प्रसंग येथे दिले आहेत.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१. ‘अबोल असणे’ आणि ‘प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधिकेला केलेले साहाय्य

१ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधिकेची अबोल प्रकृती ओळखून प्रतिदिन जे साधक भेटतील त्यांच्याशी स्वतःहून बोलण्यास सांगणे : माझी प्रकृती मूलतः अबोल आहे. त्यामुळे मी पटकन कुणामध्ये मिसळत नसे आणि स्वतःहून कुणाशी पटकन बोलत नसे. कुणी काही माझ्याशी बोलले, तर मी समोरच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नांना केवळ उत्तर देत असे. तेव्हा सद्गुरु दादांनी माझी प्रकृती अचूक ओळखली. त्यांनी मला सांगितले, ‘‘ताई, तुम्ही प्रतिदिन प्रसाद आणि महाप्रसाद घेण्यासाठी गेल्यावर त्या वेळी जे साधक भेटतील, त्यांच्याशी तुम्ही स्वतःहून बोलायचे अन् त्या साधकांकडे पाहून हसायचे.’’

१ आ. साधकांशी बोलतांना साधिकेच्या मनात संघर्ष होऊन स्वतःची प्रतिमा जपण्याविषयी विचार येणे : तेव्हा ‘आता त्यांच्याशी काय बोलायचे ?’, असा माझ्यापुढे प्रश्न होता. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही त्यांना ‘अल्पाहार घेतला का ? महाप्रसाद झाला का ?’ एवढेच विचारा.’’ त्या वेळी माझ्या मनात संघर्ष होऊ लागला, ‘मी तर साधकांना महाप्रसाद घेतांना पाहिलेले आहे, तर त्यांना ‘परत काय विचारायचे ?’ त्यांना काय वाटेल ?’ माझ्या मनात प्रतिमा जपण्याविषयीचे असे विचार तीव्रतेने यायचे.

 १ इ. साधिकेला प्रेमाने स्वभावदोषांची जाणीव करून देणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे ! : सद्गुरु दादांनी माझ्यातील ‘अबोल असणे’ आणि ‘प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषांविषयी जाणले होते. त्यामुळे दिवसभरात जेवढ्या वेळा ते मला भेटतील, तेवढ्या वेळा ते मला माझ्यातील या स्वभावदोषांविषयी विचारायचे. प्रत्येक वेळी मी त्यांच्याशी बोलायच्या आधी तेच माझ्याशी बोलायचे आणि मला जाणीव करून द्यायचे. जाणीव करून देतांनाही ते अत्यंत प्रेमाने आणि हसत-खेळत बोलायचे. त्यामुळे ‘मला प्रयत्न करायला हवेत’, याची जाणीव झाली.

१ ई. मनाचा संघर्ष अल्प होऊन प्रयत्न होऊ लागणे : त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी माझ्या मनात होणारा संघर्ष उणावू लागला. माझे काही प्रमाणात प्रयत्न होऊ लागले. माझ्या मनातील संघर्ष अल्प झाल्यावर ‘माझ्या मनावर इतरांशी बोलण्यासाठी किती दडपण असायचे आणि त्यासाठी मला किती संघर्ष करावा लागायचा ?’, याची मला जाणीव झाली.

१ उ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी स्वतःहून बोलणे आणि साधिकेच्या कृतीचे कौतुक करणे : आम्ही काही साधक शिबिराच्या शेवटच्या दिवशी सभागृहात सेवा करत होतो. तेव्हा मला समोरून सद्गुरु राजेंद्रदादा येतांना दिसले. त्या वेळी मी पटकन उठले आणि त्यांच्याकडे जाऊन स्वतःहून त्यांच्याशी बोलले. ‘ही कृती माझ्याकडून कशी झाली ?’, हे माझे मलाच कळले नाही. तेव्हा सद्गुरु दादांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी माझ्या या लहानशा कृतीचे कौतुक केले आणि मला आणखी प्रोत्साहन दिले.

१ ऊ. साधकांना निरपेक्षतेने आणि प्रेमाने हाताळणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे ! : सद्गुरु दादांनी माझ्या साधनेतील ‘अबोल असणे’ आणि ‘प्रतिमा जपणे’ हा पुष्कळ मोठा अडथळा दूर केला. त्यांच्या त्या कृपेची जाणीव आता मला तीव्रतेने होत आहे. माझा हा अडथळा माझ्या प्रयत्नांनी दूर करण्यासाठी किती वर्षे लागली असती ठाऊक नाही; पण सद्गुरु राजेंद्रदादांची तळमळ आणि प्रीती यांमुळे माझा हा अडथळा ८ ते १० दिवसांत दूर झाल्याचे मी अनुभवले. या प्रसंगातून ‘साधकाला दिलेले ध्येय त्याच्याकडून पूर्ण होण्यासाठी मला स्वतःला किती कष्ट घ्यायला हवेत ? मी साधकाला किती साहाय्य करायला हवे ?’, हे माझ्या लक्षात आले. यासाठी सद्गुरु दादा यांच्याप्रमाणे साधकांना निरपेक्षतेने आणि प्रेमाने हाताळायला हवे’, हे मला शिकायला मिळाले.

२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी दायित्व घेऊन सेवा करण्यास शिकवणे

आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे

२ अ. सद्गुरु दादांनी साधकांना पाठवायची सूत्रे असलेली धारिका पूर्ण करण्यास सांगणे आणि ती परिपूर्ण होईपर्यंत प्रयत्न करून घेणे : वर्ष २००९ – २०१० मध्ये मला एका सेवेचे दायित्व घेण्यास सांगितले. त्याविषयी मला काहीच ठाऊक नव्हते. त्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादांकडे दायित्वाची सेवा होती. तेव्हा मी सेवेसाठी देवद आश्रमात जात होते. एकदा सद्गुरु दादांनी (जिल्ह्यांना पाठवायची सूत्रे) साधकांना पाठवण्याच्या सूत्रांची एक धारिका मला करण्यास सांगितली. मी ती धारिका सिद्ध केली आणि त्यांना दाखवली. त्यांनी ‘धारिकेतील सूत्रे इतरांना समजतील, अशा पद्धतीने लिहायला हवीत’, असे मला सांगितले. मी ती धारिका जवळपास १० ते १२ वेळा सुधारली. मी ती धारिका ‘स्वतःला समजेल’, अशा पद्धतीने करत होते, तर ते मला प्रत्येक वेळी वाक्यांतील त्रुटी दाखवून इतरांना समजेल, अशा पद्धतीने विस्ताराने लिहायला शिकवत होते. धारिका झाल्यावर त्यांनी मला सहसाधकांना दाखवायला सांगितली. ‘त्यामध्ये कुणाच्या काही सूचना आहेत का ?’ हे विचारण्यास सांगितले.

२ आ. ‘प्रत्येक सेवेच्या माध्यमातून समष्टीचा व्यापक विचार कसा करायचा ? आणि परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकवणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे ! : माझे स्वभावदोष ‘संकुचित वृत्ती, इतरांचा विचार नसणे आणि पाट्याटाकू वृत्ती’ असे होते. त्यामुळे ते मला ‘एका लहानशा सेवेच्या माध्यमातून समष्टीचा व्यापक विचार कसा करायचा ? परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकवत होते. त्यांनी मला ‘सहसाधकांना सेवेत सामावून कसे घ्यायचे ? त्यांचे मत घेऊन सेवा परिपूर्ण कशी करायची ? स्वतःचा कर्तेपणा यातून न्यून कसा करायचा ?’, हे शिकवले. त्यामुळे मला प्रत्येक धारिका करतांना त्या प्रसंगाची आठवण होऊन मी ‘ती धारिका इतरांना समजेल, अशी झाली आहे का ?’, हे पहाण्याचा प्रयत्न करू लागले. या प्रसंगातून मला ‘साधकांना सिद्ध करायचे, तर त्यांच्यासाठी किती वेळ द्यायला हवा ? प्रत्येक सेवा गुणांसहित कशी करायची ?’, हे शिकायला मिळाले.

३. सद्गुरु दादांना मणक्याचा तीव्र त्रास असूनही त्यांनी स्वतःचा विचार न करता सांडलेला कापूर गोळा करणे 

देवद आश्रमात असतांना माझ्या मणक्यांना दुखापत झाली. त्यामुळे मला चालतांना त्रास व्हायचा. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी ‘खाली वाकू नका आणि खाली बसू नका’, असे मला सांगितले होते. एक दिवस मी व्यायामाकरिता मार्गिकेमधून चालत होते. तेव्हा माझ्या हातातील कापराची डबी खाली पडून त्यातील कापूर खाली सांडला. ‘सांडलेला कापूर कसा उचलायचा ?’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादा समोरून आले आणि त्यांनी पटकन खाली बसून कापूर गोळा केला आणि डबी माझ्या हातात दिली. सद्गुरु दादांनाही मणक्याचा तीव्र त्रास आहे. त्यांना तीव्र वेदना होत असतात, तरी त्यांनी स्वतःच्या देहाचा विचार न करता माझ्यासाठी खाली बसून कापूर गोळा केला. ते पाहून प्रत्यक्ष ‘भगवंतच माझ्या साहाय्यासाठी आला आहे’, असे मला वाटले. त्या प्रसंगातून मला ‘दिसेल ते कर्तव्य, साधकांप्रति प्रेम, देहबुद्धीचा त्याग करून साधकांसाठी देह झिजवणे आणि अहं नसणे’, हे सर्व गुण शिकायला मिळाले.

४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या त्रिसूत्रीमुळे दायित्वाच्या सेवेच्या अंतर्गत आवश्यक गुण वृद्धींगत होण्यास साहाय्य मिळणे 

मला सद्गुरु राजेंद्रदादांनी प्रयत्न करण्यासाठी त्रिसूत्री सांगितली होती. ‘योग्य करण्यासाठी धडपडणे, परिपूर्ण सेवा करण्यासाठी तडफडणे आणि आपल्यासारखा साधक घडवण्याचा ध्यास ठेवणे’, अशी ती त्रिसूत्री होती. या त्रिसूत्रीप्रमाणे माझ्याकडून प्रयत्न झाला. त्यामुळे त्या दायित्वाच्या सेवेच्या अंतर्गत आवश्यक असणारे गुण माझ्यामध्ये काही प्रमाणात वृद्धींगत होण्यास साहाय्य झाले.

‘हे गुरुदेवा, ‘तुमच्या कृपेमुळे मला सद्गुरु राजेंद्रदादांच्या सत्संगाचा काही दिवस लाभ झाला आणि त्यांच्याकडून अनेक गुण शिकायला मिळाले.’ मी त्यांच्या चरणी हे कृतज्ञतापुष्प अर्पण करते. ‘मी सर्व गुण कृतीत आणण्यास अल्प पडले, तरी यापुढील प्रयत्न आपणच माझ्याकडून करवून घ्यावेत’, अशी तुमच्या आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी प्रार्थना करते.’

– केवळ गुरुदेवांची,

आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे (वय ५७ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (२४.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक