|
भोसरी (जिल्हा पुणे) – येथील बांधकाम प्रकल्पासाठी तकलादू पद्धतीने उभारण्यात आलेली पाण्याची टाकी कामगारांवर कोसळली. यात ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १५ कामगार घायाळ झाले. टाकीच्या ढिगार्याखाली अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. भोसरीच्या सद्गुरुनगरमध्ये ही घटना २४ ऑक्टोबरला सकाळी घडली. रुग्णवाहिका, अग्नीशमनदलाचे कर्मचारी, बचाव पथकाचे अधिकारी यांनी साहाय्यकार्य केले. संतप्त झालेल्या स्थानिकांनी टाकी बांधणार्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या ढिगारा हटवून घायाळ झालेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात भरती केले जात आहे; पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाइकांनी विरोध केला.
ही घटना अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. साहाय्यकार्य युद्ध पातळीवर चालू आहे. संबंधित अधिकार्यांकडून वेळोवेळी माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. – अजित पवार, पालकमंत्री, पुणे
घटना निष्काळजीपणामुळे घडल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप !
टाकी कोसळल्यावर घायाळ झालेल्यांना लगेच उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेत आली असती, तर काहींना वाचवता आले असते. २-३ दिवस आधीच ही टाकी बांधण्यात आली होती. ती ओली होती. त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा ठपका प्रत्यक्षदर्शींनी ठेवला आहे.