India China Agreement : प्रत्‍यक्ष नियंत्रणरेषेच्‍या ठिकाणी गस्‍त घालण्‍याच्‍या संदर्भात भारत आणि चीन यांच्‍यात करार !

नवी देहली – भारत आणि चीन यांच्‍यामधील प्रत्‍यक्ष नियंत्रणरेषेविषयी दोन्‍ही देशांमध्‍ये करार झाला आहे. भारत आणि चीन यांच्‍यामध्‍ये पुन्‍हा गस्‍त घालण्‍यावर एकमत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियामध्‍ये २२ आणि २३ ऑक्‍टोबर या दिवशी होणार्‍या १६ व्‍या ब्रिक्‍स (ब्राझिल, रशिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन या देशांची परिषद) परिषदेसाठी रशियाला जाण्‍यापूर्वी हा करार झाला आहे. या परिषदेला चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग उपस्‍थित रहाणार आहेत.

१. भारतीय परराष्‍ट्र मंत्रालयाचे परराष्‍ट्र सचिव विक्रम मिसरी म्‍हणाले की, गेल्‍या अनेक आठवड्यांपासून झालेल्‍या चर्चेच्‍या परिणामी भारत-चीन सीमा भागात प्रत्‍यक्ष नियंत्रणरेषेवर गस्‍त व्‍यवस्‍थेवर एक करार झाला आहे.

२. वर्ष २०२० मध्‍ये या क्षेत्रांमध्‍ये उद़्‍भवलेल्‍या समस्‍यांचे निराकरण केले जात आहे. करारानुसार दोन्‍ही देशांचे सैन्‍य डेपसांग आणि डेमचोक येथील त्‍यांच्‍या जुन्‍या ठिकाणी परत जातील. यासमवेतच ‘बफर झोन’ (दोन्‍ही देशांच्‍या सीमांमधील भाग) मध्‍ये गस्‍त घालण्‍याचा मार्गही मोकळा झाला आहे.

३. वर्ष २०२० पासून भारत आणि चीन यांच्‍यात सीमा विवाद आहे. चीनने सीमेवरील स्‍थिती बदलल्‍यानंतर दोन्‍ही देशांच्‍या सीमेवर तणाव निर्माण झाला होता. गलवानमध्‍ये चिनी आणि भारतीय सैनिकांमध्‍ये चकमक झाली. यानंतर दोन्‍ही देशांकडून प्रत्‍यक्ष नियंत्रणरेषेवर सैन्‍याची तैनाती वाढवण्‍यात आली.