आतंकवादी आक्रमणाचा संशय
नवी देहली – येथील रोहिणी सेक्टर १२ येथील प्रशांत विहार परिसरात असणार्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शाळेच्या भिंतीजवळ सकाळी मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. हे पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. येथील काही दुकानांची हानी झाली, तसेच तेथे उभ्या असणार्या वाहनांच्या काचा फुटल्या.
१. पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी सांगितले की, आम्ही या स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी काही तज्ञांच्या पथकाला पाचारण केले आहे. हा स्फोट कशाचा होता, ते अद्याप समजू शकलेले नाही. तज्ञांचे पथक अन्वेषण करून याची माहिती देईल.
२. पोलिसांनी सांगितले की, या स्फोटामागे आतंकवादी संबंध आहे का ?, या दृष्टीनेही अन्वेषण केले जाईल. सध्या जवळपासच्या पोलीस ठाण्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. बाजारपेठांमध्ये पायी गस्तही वाढवण्यात आली आहे. लोकांनी कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
३. घटनास्थळी येऊन ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’च्या पथकाकडूनही पडताळणी केली जात आहे. या ठिकाणी पांढरी पावडर सापडल्याने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून त्याची तपासणी केली जात आहे. एखाद्या मोठ्या आतंकवादी आक्रमणाची ही चाचणी होती का ? अशी शक्यताही पडताळून पहाण्यात येत आहे.