‘संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले इत्यादी संत शांत आणि पराकोटीची प्रीती करणारे का असतात ? माझ्यासारख्या साधकांनी त्यांच्यासारखे होण्यासाठी काय करायला हवे ?’, असे विचार माझ्या मनात आले. तेव्हा गुरुदेवांनी मला पुढील विचार सुचवले आणि साधनेची दिशा दिली.
१. संतांमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू अत्यल्प असतात. त्यांचा मनोलय आणि बुद्धीलय झालेला असतो.
२. ‘सर्व काही ईश्वरेच्छेने घडते’, अशी संतांची अढळ श्रद्धा असते.
३. अपेक्षाभंगाचा किंवा राग येण्याचा एखादा प्रसंग घडला असता ‘ते देवाचे नियोजन आहे आणि त्यातून सर्वांचे भले होणार आहे’, अशी त्यांची धारणा असते.
४. ‘राग किंवा प्रतिक्रिया, म्हणजे दुसर्यांच्या स्वभावदोषांचा स्वतःवर उगवलेला सूड असतो’, हे संतांना पक्के ठाऊक असते. त्यामुळे संतांमध्ये सूडभावना, द्वेष, पूर्वग्रह, प्रतिक्रिया इत्यादी काहीच नसतात.
५. ‘एखादे संत रागावणारे किंवा अयोग्य वागणारे आहेत’, असे एखाद्या व्यक्तीला संतांच्या बाह्य वागण्यावरून वाटू शकते; पण तेही ईश्वराचे नियोजन असते. संत ईश्वरेच्छेने वागत असतात. संत ज्याच्यावर ओरडतात, संतांना त्या व्यक्तीचे प्रारब्ध न्यून करायचे असते. त्याला साधना करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन मायेतून बाहेर काढायचे असते.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ यानुसार संत हे वेगवेगळ्या प्रकारचे दिसत असले, तरी ते स्वस्वरूपाशी, म्हणजे ईश्वराशी एकरूप झालेले असतात. शांतीचे प्रतीक (पुतळे) असलेल्या संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अशा संत महात्म्यांच्या चरणी मी कोटीशः वंदन करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.९.२०२४)
भगवंताने ‘ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे’, असे म्हटले आहे; कारण ज्ञानात प्रवास चालू असतो. ध्यानात प्रवासी आणि ज्याच्यासाठी प्रवास करायचा असतो, ते एकच झालेले असतात.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’) |