रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर वाराणसी येथील श्री. शुभम विश्‍वकर्मा यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. रामनाथी आश्रमात येतांना प्रवासामध्‍ये अनेक अडचणी येणे आणि नियोजित वेळेपेक्षा पुष्‍कळ अधिक वेळ लागूनही थकवा न जाणवणे

श्री. शुभम विश्‍वकर्मा

‘मला घरून रामनाथी आश्रमात येतांना पुष्‍कळ अडचणी आल्‍या. आमची रेल्‍वे २० घंटे उशिरा निघणार असल्‍यामुळे माझे वडील मला गोव्‍याला येऊ देत नव्‍हते. त्‍यांचे म्‍हणणे होते, ‘मी काही दिवसांनंतर आश्रमात जावे’; परंतु माझ्‍या मनाचा पक्‍का निर्धार झाला होता, ‘मला आताच आश्रमात जायचे आहे.’ नंतर वाराणसी सेवाकेंद्रातून श्री. राजन केसरीदादा यांचा भ्रमणभाष आला आणि त्‍यांनी माझ्‍या वडिलांना समजावून सांगितले. त्‍यानंतर माझे वडील मला पाठवायला सिद्ध झाले. तेव्‍हा मला गुरुदेवांच्‍या चरणी पुष्‍कळ कृतज्ञता वाटली, ‘त्‍यांच्‍यामुळेच हे सर्व घडले आहे.’ रामनाथी आश्रमात पोचण्‍यासाठी मला जवळजवळ ४ दिवसांचा प्रवास करावा लागला, तरीही मला मुळीच थकवा जाणवला नाही.

२. ध्‍यानमंदिरात नामजप करतांना ‘आश्रमातच राहून गुरुदेवांच्‍या चरणी सेवा करता येऊ दे’, अशी प्रार्थना करणे

५.६.२०२३ या दिवशी मी रामनाथी आश्रमातील ध्‍यानमंदिरात नामजप करत होतो. त्‍या वेळी मी मानसरित्‍या गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) चरण पकडून रडत होतो आणि गुरुदेवांना सांगत होतो, ‘मला येथेच रहायचे आहे आणि मला दुसरीकडे कुठेही जायचे नाही. मला आपल्‍या चरणी राहूनच सेवा करायची आहे.’

३. आश्रमातील साधक स्‍वतःच्‍या परिवारातील वाटणे

रामनाथी आश्रमातील सर्व साधक मला आपलेच वाटतात. माझ्‍या मनात विचार येत होता, ‘मायेतले माझ्‍या परिचयातील लोक आणि माझे जवळपासचे शेजारी हे सर्वजण माझ्‍याकडून काहीतरी अपेक्षा ठेवूनच माझ्‍याशी जोडलेले आहेत. ‘माझे भले व्‍हावे’, असा विचार करणारे त्‍यांच्‍यापैकी कुणीच नाही; परंतु आश्रमातील सर्व साधक मला माझ्‍या परिवारातीलच वाटतात. ‘येथील प्रत्‍येक साधक केवळ माझे भले व्‍हावे’, असाच विचार करतात. ते सतत मला काही ना काही शिकवतात. त्‍यामुळे मला भविष्‍यात जर एखाद्या संकटाचा सामना करावा लागला, तर मी सक्षमपणे त्‍याचा सामना करू शकीन.

४. ध्‍यानमंदिरात नामजप करतांना आलेल्‍या अनुभूती

अ. ध्‍यानमंदिरात नामजप करतांना ‘प्रत्‍येक दिवशी गुरुदेव माझ्‍या स्‍थूल आणि सूक्ष्म देहांतून माझे अवगुण नष्‍ट करत आहेत अन् मला ईश्‍वराकडे, म्‍हणजे मोक्षाकडे घेऊन जात आहेत’, असे मला जाणवले.

आ. ५.६.२०२३ या दिवशी नामजप करतांना मला केवळ श्री दुर्गादेवीच दिसत होती. मी नामजप करतांना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करत होतो; परंतु ‘माझा नामजप ‘श्री दुर्गादेव्‍यै नमः।’ असा केव्‍हा पालटला ?’, ते मला समजलेच नाही. नंतर मी डोळे उघडले. तेव्‍हा मला समोर श्री दुर्गादेवीची पितळेची मूर्ती दिसली. ही मूर्ती आश्रमातील ध्‍यानमंदिरात आहे. तिच्‍यामुळेच मला ही अनुभूती आली.

इ. ध्‍यानमंदिरात ९.६.२०२३ ला मी गुरुदेवांच्‍या छायाचित्राकडे पहात नामजप करत होतो. तेव्‍हा मला तेथे ‘साक्षात् गुरुदेव माझ्‍यासमोर उभे आहेत आणि ते हसत आहेत’, असे जाणवले. ‘स्‍वतः गुरुदेवच मला दर्शन देण्‍यासाठी आले आहेत. माझ्‍या शरिरातील त्रासदायक शक्‍ती, म्‍हणजे आवरण काढून ते नष्‍ट करत आहेत’, असे मला वाटत होते.  त्‍यानंतर माझे संपूर्ण शरीर हलके झाले होते.

५. आश्रमात सेवा करतांना ‘गुरुदेवच सेवा करून घेत आहेत’, असे वाटणे

आश्रमात सेवा करतांना मला ‘मी आता थकलो आहे आणि मी सेवा करू शकत नाही’, असे कधीच जाणवले नाही. ‘माझ्‍या सर्व सेवा स्‍वतः गुरुदेवच माझ्‍या माध्‍यमातून करून घेत आहेत. ज्‍या सेवांचे फळ माझे नव्‍हते, ते सुद्धा त्‍यांनी मला दिले’, असे मला वाटत होते.

या अनुभूती दिल्‍याबद्दल गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– श्री. शुभम विश्‍वकर्मा, वाराणसी, उत्तरप्रदेश. (१.७.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक