आपण सतत देवाकडे आणि माणसांकडे काही ना काही तरी मागतच असतो. लहानपणी देवाला प्रार्थना करायला सांगतांना मोठी माणसे सांगत असत की, गणपतीकडे बुद्धी मागावी, लक्ष्मीकडे धन मागावे, सरस्वतीदेवीकडे विद्या मागावी वगैरे. आपल्या दैनंदिन आवश्यकता भागवण्यासाठी आपण अनेक जणांकडे अनेक गोष्टी मागत असतो. किराणा दुकानात गेल्यावर धान्याचे पदार्थ मागायचे आपल्याला कळते. औषधाच्या दुकानात गेल्यावर वैद्यांनी लिहून दिलेली औषधे आपण मागतो; पण मंदिरात गेल्यावर ‘देवाकडे काय मागायचे ?’, हे लक्षात येत नाही.
‘पूर्वसुकृतामुळे देव आपल्यावर प्रसन्न झाला आहे’, असे समजूया. समजा देव आपल्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, ‘तुला काय हवे ते माग’, तर त्या वेळी आपण गोंधळून जाऊ. आपण वाचलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींतून ‘देवाकडे कुणी काय मागितले ?’ ते आठवायला लागते. अनेकांनी वेगवेगळे वर देवाकडे मागितल्याचे लक्षात येते; परंतु ‘त्याचा त्यांना कितपत लाभ झाला ?’ याचा विचार केला, तर ‘ते मागायला चुकले’, असेच लक्षात येते. कुणी धनसंपत्ती मागितली, कुणी दीर्घायुष्य मागितले, कुणी ‘अमक्याकडून मरण नको-तमक्याकडून मरण नको’, असे वर मागितले. हल्ली कुणी नोकरी, गाडी-बंगला, बायको-मुले मागतात. ‘जन्माला आला, तर तो मरणारच आहे, मिळालेले धन इथेच सोडून जाणार आहे, बायको-मुले हे काही काळापुरतेच साथी आहेत’, याचा त्यांना विसर पडतो. देव इच्छित वर देतात; परंतु ‘वर मागणार्याला त्याचा लाभ होतो का ?’ याचे उत्तर ‘नाही’ असेच येते. ‘मनुष्यजन्माचे ध्येय ईश्वरप्राप्ती करून घेणे आणि जन्म-मरणाच्या फेर्यांतून मुक्ती मिळवणे’, हे आहे.
असे जर आहे, तर मग देवाकडे काय मागितले पाहिजे ? पूर्वजन्मांत केलेल्या कर्माचा परिणाम म्हणून आपल्याला जन्माला यावे लागले. या एकाच जन्मात जे काही प्रारब्ध-संचित माझ्या नावावर देवाने नोंद केलेले आहे, ते मला भोगून संपवायचे आहे आणि जन्म-मरणाच्या फेर्यांतून सुटका करून घ्यायची आहे. माझे प्रत्येक क्रियमाण म्हणजे कर्म हे अकर्म झाले पाहिजे. म्हणजे कर्माचे फळ भोगावे लागले नाही, तर माझे नवीन संचित प्रारब्ध निर्माण होणार नाही. हे कसे साध्य करायचे ? कर्माचे कर्तेपण देवाला अर्पण केले, तर त्याचे फळ भोगावे लागत नाही. यासाठी साधा आणि सोपा उपाय म्हणजे सतत भगवंताच्या अनुसंधानात रहाणे. नामजप केल्याने कर्म अकर्म होते. त्यामुळे संचित वाढत नाही आणि पूर्वीचे प्रारब्ध संपत जाते. नामजपाने कर्माचे फळ प्रारब्धरूपाने भोगण्यापासून आपली सुटका होते. म्हणून भगवंताकडे नामाचे प्रेम आणि सतत नामजप होण्यासाठी बळ मागूया !
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.