कळंगुट (गोवा) येथे तरुणींची छेड काढणार्‍याला प्रथम तरुणींनी आणि नंतर ग्रामस्थांनी चोपले !

  • छेड काढणार्‍या दोघांना अटक

  • कळंगुट येथे ‘डान्सबार’ आणि दलाल यांना थारा न देण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

म्हापसा, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – दांडिया नृत्य संपवून घरी परतणार्‍या ३ मुलींची छेड काढणारे पर्यटक आणि त्यांच्यासमवेत असलेला दलाल यांना चोप देण्याची घटना १२ ऑक्टोबर या दिवशी पोरबावाडा, कळंगुट येथे घडली. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी पर्यटक आणि दलाल यांना ते रहात असलेल्या सदनिकेतून हुसकावून लावले. या विषयावरून ग्रामस्थ संतापले असून सर्व दलालांना कळंगुट येथून हुसकावून लावण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. मुलींची छेड काढणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

घटना घडलेल्या ठिकाणी नवीन क्लब चालू झाला आहे आणि येथे दुसर्‍या मजल्यावर पर्यटकांची रहाण्याची सोय करण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर या दिवशी मध्यरात्रीनंतर सुमारे २.३० वाजता दांडिया संपवून घरी परतणार्‍या ३ स्थानिक मुलींची पर्यटक दिलीपकुमार (रहाणारा देहली) आणि दलाल यांनी छेड काढली. पर्यटक ‘रेंट-ए-कार’ (भाडेपट्टीवर चारचाकी घेणे) मधून आला होता. पर्यटकाने मुलींचा हात पकडून त्यांच्याकडे ‘आती है क्या, कितना लेगी ?’, अशी विचारणा केली. यावरून पर्यटक आणि मुली यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वेळी मुलींनी पर्यटकाला बरेच चोपले आणि घटनेची माहिती भ्रमणभाषवरून नातेवाइकांना दिली. यानंतर लगेच घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पर्यटक आणि दलाल यांना चोप देऊन त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

या घटनेनंतर १३ ऑक्टोबरला रात्री स्थानिक पंचसदस्य आणि ग्रामस्थ यांनी या विषयावर बैठक घेतली अन् या बैठकीत कळंगुट येथे ‘डान्स बार’ आणि दलाल यांना स्थान न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शासनाने कळंगुट ‘डान्स बार मुक्त’ करावे, अन्यथा लोक रस्त्यावर उतरून ते करतील !

याविषयी पंचसदस्य स्वप्नेश वायंगणकर म्हणाले, ‘‘डान्स बार’ आणि दलाल यांच्या विरोधात आता ग्रामस्थ जागरूक झालेले असल्याने हे प्रकार आता येथून कायमचे बंद होणार आहेत.’’ पंचसदस्य प्रसार शिरोडकर म्हणाले, ‘‘कळंगुट येथील ‘डान्स बार’ बंद करण्यासाठी सरपंचांना निवेदन देण्यात येणार आहे.’’ ग्रामस्थ नितेश चोडणकर म्हणाले, ‘‘डान्स बार’मुळे कळंगुटचे नाव अपकीर्त झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून कळंगुट ‘डान्स बारमुक्त’ करावे. सरकार हे करू शकत नसल्यास नागरिक रस्त्यावर उतरून हे करतील.’’