Rope-way At Nimgaon Khandoba : निमगाव खंडोबा देवस्थान परिसरात रोप-वे उभारणार !

पुणे – खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबा मंदिर देवस्थान परिसरात रोप-वे आणि अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. याद्वारे पर्यटन सुविधांचा विकास होणार असून तेथील आध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळेल. यासाठी परिसरातील १०० कोटी रुपये किंमतीची २४ एकर शासकीय गायरान भूमी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली असल्याचा शासन निर्णय घोषित करण्यात आला आहे.

देवस्थानच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री, तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भूमी कह्यात घेतल्यानंतर ३ वर्षांच्या आत संमत प्रयोजनासाठी भूमीचा वापर चालू करणे, तसेच या भागात वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. या शासन निर्णयामुळे राज्याबाहेरील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून ‘मौजे निमगाव खंडोबा देवस्थान परिसराच्या विकासाला गती मिळेल’, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.