|
मिरज (जिल्हा सांगली), १३ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील ब्राह्मणपुरीमधील श्री अंबाबाई मंदिराजवळ ३ ऑक्टोबर म्हणजे नवरात्रोत्सवानिमित्त चालू झालेल्या श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाची ११ ऑक्टोबर या दिवशी उत्साहात सांगता झाली. ३ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत या महोत्सवात शास्त्रीय गायन, भरतनाट्यम् नृत्य कार्यक्रमास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासकरून नृत्यांगना पूर्वी भावे (मुंबई) यांनी उत्कृष्टपणे भरतनाट्यम् नृत्य सादर करून मिरजकरांची मने जिंकली.
या महोत्सवात श्रुती सडोलीकर काटकर (मुंबई), श्री. रजत कुलकर्णी (कित्तुर), श्री. आकाश पंडित (बेळगाव), विदुषी श्रुती बजुरबरुहा, विदुषी भाग्यश्री देशपांडे (मुंबई), डॉ. शैलुशा वडपल्ली (पुणे), पं. हृषिकेश बोडस, पं. डॉ. अविनाश कुमार (देहली), श्री. ईश्वर घोरपडे आणि डॉ. वृषाली देशमुख (लातूर) यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व गायनाच्या वेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते, तसेच गायत्री पाध्ये (मुंबई) यांचे ‘सोलो तबला’वादन, तर श्री. अनुपम जोशी (पुणे) यांचे सरोदवादन, श्री. ऋषिकेश मुजुमदार (मुंबई) यांचे बासरीवादन आणि श्री. मंदार बागडे (पुणे) यांचे सारंगीवादन या सादरीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे सर्व कार्यक्रमात भरतनाट्य कार्यक्रमास श्रोत्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
अभिनेत्री, निवेदिका, नाटककार आणि नृत्यांगना पूर्वी भावे यांनी भरतनाट्यम् मधील ५ प्रकारच्या रचना सादर केल्या. यामध्ये ‘आनंद नर्तन गणपति’ ही गणेशाच्या नृत्याचे वर्णन करणारी रचना, चौंडेश्वरी दुर्गेश्वरी ही देवीच्या विविध रूपांचे वर्णन (वंदन) करणारी रचना, नाट्यपद मालिका ज्यात ३ नाट्यगीतांची मालिका सादर केली, संगीत स्वरसम्राज्ञीमधील ‘कशी केलीस माझी दैना, कठीण कठीण किती, त्यानंतर शेवटी ‘रे तुझ्यावाचून काही’, पारंपरिक वात्सल्य पद ‘ता ये यशोदा’ (श्रीकृष्ण आणि गोपी) आणि शेवटी ‘तिल्लाना’ या नृत्यरचनेने शेवट केला.
रसिकांचा प्रतिसाद पाहून पूर्वी भावे भारावून गेल्या..
व्यासपिठावर सादरीकरण करण्यापूर्वी पूर्वी भावे म्हणाल्या की, मिरज येथे माझ्या भरतनाट्यम् कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद मिळेल कि नाही, अशी मला शंका होती; मात्र येथे रसिकांनी दिलेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेले. श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाने पुन्हा मला संधी दिली, तर मी पुन्हा येथे येऊन नवीन नवीन रचना सादर करण्याचा प्रयत्न करीन. नाट्यसंगीताशी माझे लहानपणापासून अधिक जवळून संबंध आहेत, तसेच या व्यासपिठावर माझ्या पंच आजी इंदिराबाई खाडीलकर यांनी सादरीकरण केले होते. आज मी म्हणजे तिसरी पिढी या व्यापिठावर सादरीकरण करत आहे. माझे नृत्य श्रोत्यांना आवडले, तर हा एकप्रकारे मला मिळालेला आशीर्वाद आहे, असे मी समजेन.