मुंबई – महाराष्ट्रातील प्राचीन आणि जगप्रसिद्ध श्री अष्टविनायक मंदिरांतील श्री मयुरेश्वर मंदिर (मोरगाव, पुणे), चिंतामणी मंदिर (थेऊर, पुणे), श्री विघ्नेश्वर मंदिर (ओझर, पुणे), श्री महागणपति मंदिर (रांजणगाव मंदिर, पुणे), श्री वरदविनायक मंदिर (महड, रायगड), श्री बल्लाळेश्वर मंदिर (पाली, रायगड) आणि श्री सिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक, जिल्हा अहिल्यानगर) या ७ मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासाठी ९२ कोटी १९ लाख रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे.
यामध्ये श्री मयुरेश्वर मंदिराला ७ कोटी ३० लाख रुपये, श्री चिंतामणी मंदिराला ६ कोटी ६२ लाख रुपये, श्री विघ्नेश्वर मंदिराला ६ कोटी ८९ लाख रुपये, श्री महागणपति मंदिराला ६ कोटी ३५ लाख रुपये, श्री वरदविनायक मंदिराला १३ कोटी ९५ लाख रुपये, श्री बल्लाळेश्वर मंदिराला १४ कोटी ९० लाख रुपये, तर श्री सिद्धिविनायक मंदिराला ६ कोटी ६६ लाख रुपये असा निधी देण्यात येणार आहे. यातून मंदिरांचे जतन, संवर्धन आणि परिसर व्यवस्थापन यांसह विद्युतीकरण अन् अन्य कामे केली जाणार आहेत. जीर्णोद्धार करतांना मंदिराची मूळ शैली कायम रहावी, यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे केली जाणार आहेत. संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीने या मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामांचे प्रस्ताव राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवले होते. शासनाने त्यांना मान्यता दिली आहे.