अहिल्यानगर – अहमदनगर शहराचे नाव पालटून ते ‘अहिल्यानगर’ असे करण्याविषयी राज्यशासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. जिल्ह्याचे नाव अहमदनगर असेच रहाणार आहे. (सर्वत्रचे नाव पालटणे आवश्यक ! – संपादक) शासनाचे उपसचिव दि.ब. मोरे यांच्या नावाने ४ ऑक्टोबरला हे राजपत्र प्रकाशित झाले आहे. अहमदनगर शहराच्या नामकरणास गृह मंत्रालयाने १ ऑक्टोबरला अनुमती दिली. त्यानुसार या अधिसूचनेद्वारे अहमदनगर शहराचे नाव पालटून ‘अहिल्यानगर, तालुका आणि जिल्हा अहमदनगर’, असे करण्यात येत आहे, असे या राजपत्रात म्हटले आहे. असाधारण क्रमांक ११२ या क्रमांकाने हे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवीच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार हे राजपत्र प्रसिद्ध केले आहे. येत्या ८ दिवसांत सर्व ठिकाणचे अहमदनगर नाव हटवून ‘अहिल्यानगर’ करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे. नगर तालुका आणि जिल्ह्याच्या नामकरणाविषयी महसूल विभागाकडून कार्यवाही होणार आहे. पत्ता सांगतांना आणि लिहितांना सध्यातरी ‘अहिल्यानगर, ता. जि. अहमदनगर’, असेच रहाणार आहे.