वर्ष २०१० मध्ये गुप्तीनंदी महाराजांच्या प्रेरणेतून साकारले मंदिर !
छत्रपती संभाजीनगर – राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैनपंचायतीच्या अंतर्गत जिल्ह्यातील कर्णपुरा येथे १२ देवींचे मंदिर उभारण्यात आले आहे. वर्ष २०१० मध्ये आचार्य गुप्तीनंदी महाराज यांच्या प्रेरणेतून हे मंदिर उभे राहिले आहे. खंडेलवाल पंथाच्या विविध १२ कुलदेवींची ही मंदिरे आहेत. कुलदेवीच्या दर्शनासाठी जैन बांधवांना दूरचा प्रवास करून राजस्थानला जावे लागत होते. यासाठी जैन समाजाने हे मंदिर साकारले आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष श्री. महावीर पाटणी यांनी दिली.
मंदिराचे संयोजक श्री. प्रमोद पांडे म्हणाले की, नोव्हेंबर २०१० मध्ये या देवींच्या मूर्तींची विधीवत् प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराचे विस्तारीकरण करणे शक्य नाही; कारण मंदिराबाहेरील संपूर्ण जागा छावणी परिषदेची आहे; मात्र अलीकडेच मंदिरात सोलार प्रकल्प लावण्यात आला आहे. देशभरातील हे एकमेव मंदिर आहे. जैन समाजात ८४ गोत्रे आहेत. प्रत्येक देवी ही किमान ६ ते ८ गोत्रांची देवी आहे. या सर्व भाविकांना या मंदिरामुळे कुलदेवीचे दर्शन शहरातच घडते. खंडेलवाल दिगंबर जैन समाज हा मूळचा राजस्थानी समाज आहे.
या समाजाच्या प्रत्येक गोत्राचे कुलदैवत राजस्थानात आहे; मात्र या देवी मंदिरात प्रतिकुलदैवतच भाविकांसाठी उपलब्ध झाले. लोसीनमाता, लोहिणीमाता, नांदणीमाता, सैतलीमाता, अमनमाता, पद्मावतीमाता, चक्रेश्वरीमाता, मातणीमाता, जमवाईमाता, औरलीमाता, जीनमाता, चौथमाता यांची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. जैनेतर बांधवही या ठिकाणी दर्शनासाठी येतात, असे त्यांनी सांगितले.