अधिक दुधासाठी म्हशीला देणार्‍या ‘ऑक्सिटोसीन’ इंजेक्शनचा मोठा साठा जप्त !

कल्याण – येथील रेतीबंदर, दूधनाका परिसरात मोठ्या प्रमाणात म्हशींचे गोठे आहेत. त्यामुळे येथून लाखो लिटर दुधाची विक्री होते. मोठमोठी आस्थापने आणि मिठाई बनवणार्‍या हलवायांना हे दूध पुरवले जाते; मात्र अधिक दूध मिळण्यासाठी म्हशीला ‘ऑक्सिटोसीन’ इंजेक्शन देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील बिसमिल्लाह हॉटेल परिसरात एका घरावर घातलेल्या धाडीच्या वेळी या इंजेक्शनचा १ लाख ६० सहस्र रुपयांचा इंजेक्शनसाठी लागणारा औषध साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मसी सादीक खोत (वय ५० वर्षे) याच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

हे इंजेक्शन कोणत्या आणि किती गोठ्यांतील म्हशींना दिले जाते ? इंजेक्शनची विक्री कोण करत आहे ? ते कुठून आणले जाते ? यात कोणत्या व्यक्ती सामील आहेत ? याचे पोलीस अन्वेषण करत आहेत.

अशा प्रकारे मिळणारे दूध मानवी शरिरासाठी, तसेच म्हशींच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. या दुधामुळे मुलांच्या शरिरातील संप्रेरकांवर विपरित परिमाण होऊ शकतो.

काय आहे ‘ऑक्सिटोसिन’ इंजेक्शन ?

‘ऑक्सिटोसिन’ इंजेक्शन मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीत तयार होणारे आणि तेथेच साठवले जाणारे संप्रेरक (हार्मोन) आहे. महिलांमध्ये प्रसूती वेदना वाढवून गर्भपिशवीचे तोंड उघडण्यासाठी स्टिम्युलेटर म्हणून या हार्मोनचा वापर आधुनिक वैद्य करतात, तसेच दूध येण्यासाठी उत्प्रेरक म्हणूनही ते काम करते.

कठोर शिक्षेचे प्रावधान !

‘ऑक्सिटोसिन’ची विनाचिठ्ठी विक्री करणार्‍या औषध विक्रेत्याचा परवाना रहित होऊ शकतो. विक्रेत्यास ५ वर्षे कारावास आणि आर्थिक दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. ऑक्सिटोसिनचा वापर करणार्‍या पशूपालकांना १ ते ३ वर्षे कारावास आणि आर्थिक दंडाचे प्रावधान आहे; पण त्यासाठी नागरिकांनी तक्रार करावी.

संपादकीय भूमिका

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी !