मराठवाड्यात १० कोटी १० लाख रुपयांची वीज चोरी उघड !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा विभागातील ८ जिल्ह्यांत गत ६ महिन्यांच्या कालावधीत वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २ सहस्र ६७३ वीजमीटरची पडताळणी केली असता यात १ सहस्र ४५१ मीटरमध्ये वीज चोरी आढळून आली. यात १ कोटी ४० लाख १३ सहस्र ६९७ युनिट वीज चोरी प्रकरणी १० कोटी १० लाख रुपयांच्या अनुमानित वीजदेयक दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात आली आहे, तर ६ कोटी ९ लाख ८६ सहस्र रुपये वसूल करण्यात आले आहेत. ६५ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. (६ महिन्यांच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज चोरी पकडण्यात येते, हे लाजीरवाणे आहे. वीज चोरीचे प्रकार थांबवायचे असतील, तर केवळ दंड वसूल न करता दंडासह वीज चोरांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत एप्रिल २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत भरारी पथक, दक्षता अन् सुरक्षा अंमलबजावणी विभागाच्या वतीने वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवली. विद्युत् कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजार्‍यांकडून अनधिकृत वीज घेणे, मान्य केलेल्या भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मान्य केलेल्या वर्गवारीतून दुसर्‍या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे यांचा समावेश होतो. कलम १३५ मध्ये मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सर्व्हिस वायर टॅप करणे आणि कलम १३८ मध्ये महावितरणचे मीटर, वायरसह इतर वस्तू चोरी करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.