सरपंचांनी ग्रामसभा न घेतल्यामुळे जिल्हाधिकार्यांचा निर्णय !
पेण, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती रेखा सचिन पाटील यांची रायगडचे जिल्हाधिकारी यांनी हकालपट्टी केली आहे. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अन्वये विहित नियमानुसार ग्रामसभा न घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
१. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३६ नुसार सरपंच किंवा त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांनी पुरेशा कारणांविना त्याविषयी विहित केलेल्या नियमांनुसार कोणत्याही वित्तीय वर्षात पंचायतीच्या सभा बोलावण्यात कसूर केल्यास तो यथास्थिती सरपंच किंवा उपसरपंच म्हणून चालू रहाण्यास अपात्र असेल. या संदर्भात जिल्हाधिकार्यांचा निर्णय अंतिम असेल, असे प्रावधान आहे.
२. २६ जानेवारी २०२४ या दिवशी वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती रेखा सचिन पाटील यांनी ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे हिंदू स्वराज्य सेनेचे अध्यक्ष श्री. किरण गोविंद शिगवण यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. या संदर्भात विस्तार अधिकारी, पेण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी यथायोग्य चौकशी करून आपला अहवाल सादर केला होता.
३. जिल्हाधिकारी, रायगड यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत श्री. शिगवण यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने जिल्हाधिकार्यांनी वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती रेखा सचिन पाटील यांना अपात्र ठरवून त्यांची सरपंच पदावरून हकालपट्टी केली.
सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा कायदेशीर मार्गाने चालूच रहाणार !हिंदू स्वराज्य सेनेचे अध्यक्ष श्री. किरण गोविंद शिगवण याविषयी म्हणाले, ‘‘आपल्याला स्वराज्य मिळाले; परंतु सामाजिक दुष्प्रवृत्तींमुळे अद्यापही सुराज्य मिळालेले नाही. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असूनही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात खेडेगावातील नागरिकांना त्यांचे हक्कही ठाऊक नाहीत. त्यामुळे स्वराज्याकडून सुराज्याच्या दिशेने जाण्यासाठीच हिंदू स्वराज्य सेना प्रयत्न करत आहे. या कार्यात हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे. त्यामुळे या यशाचे श्रेय हिंदु विधीज्ञ परिषदेचे सर्व अधिवक्ते आणि हिंदू स्वराज्य सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता यांचे आहे. यापुढेही सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील आमचा हा लढा कायदेशीर मार्गाने चालूच राहील.’’ |