वर्ष २०२४ च्या मे मासात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवचंडी याग करण्यात आला. त्या वेळी देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील साधकांना त्याचे ‘लाइव्ह स्ट्रीम’ प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. त्या वेळी देवद आश्रमातील सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५९ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. यागाच्या पहिल्या दिवशी आलेली अनुभूती
अ. ‘२८.५.२०२४ या दिवशी याग चालू होण्यापूर्वी मला वातावरणात पुष्कळ उष्मा जाणवत होता. याग चालू झाल्यानंतर वातावरणात पालट होऊन मला गारवा जाणवू लागला.
आ. माझ्या भोवतीचे अनिष्ट शक्तीचे आवरण वेगाने न्यून होत असल्याचे मला जाणवले.
इ. यागातील मंत्रपठण ऐकतांना ‘गेल्या १ मासाच्या कालावधीत मला आलेला थकवा हळूहळू न्यून होत आहे’, असे मला वाटले.
ई. यागाच्या शेवटी पूर्णाहुती झाल्यावर मला डोळ्यांसमोर क्षणभर देवीचा नथ घातलेला मुखवटा दिसला.
२. यागाच्या दुसर्या दिवशी आलेल्या अनुभूती
अ. २९.५.२०२४ या दिवशी सायंकाळी ७.३० वा. यागाला आरंभ झाल्यानंतर सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यज्ञस्थळी पूजा केलेल्या देवीविषयी माहिती सांगत होते. त्या वेळी मला आकाशात ढगांच्या आकारात तशाच प्रकारचे देवीचे रूप दिसले. त्यानंतर मला ढगांच्या आकारात देवीची मोरावर बसलेली देवी आणि अष्टभुजा देवी अशी रूपे दिसली. त्या वेळी मला ‘नवचंडी यागासाठी देवी प्रत्यक्ष आली आहे’, असे जाणवले आणि माझा भाव जागृत झाला.
आ. यागाच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून, तसेच मंत्रपठण ऐकतांना माझा भाव सातत्याने जागृत होत होता.
इ. श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि श्री. निषाद देशमुख ‘कलियुग के नारायण का रहस्य’ सांगत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रति पुष्कळ कृतज्ञता वाटली. (‘कलियुग के नारायण का रहस्य’ म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कलियुगातील अवतारकार्याची महती.)
३. यागाच्या तिसर्या दिवशी आलेली अनुभूती
३०.५.२०२४ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देवीची आरती करतांना पाहून ‘देवीच देवीची आरती करत आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी मला वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
हे गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळेच मला या अनुभूती आल्या. ही सूत्रे तुम्हीच लिहून घेतलीत, याविषयी तुमच्या कोमल चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.६.२०२४)
|