ज्येष्ठ साहित्यिका प्रा. (डॉ.) तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड !

प्रा. (डॉ.) तारा भवाळकर

पुणे – देहली येथे होणार्‍या यंदाच्या ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी लोकसंस्कृतीच्या अभ्यासिका आणि ज्येष्ठ साहित्यिका प्रा. (डॉ.) तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिक उषा तांबे यांनी पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ८३ वर्षीय प्रा. (डॉ.) तारा भवाळकर या सहाव्या महिला अध्यक्षा आहेत. ९८ वर्षांत ६ महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यातील सहाव्या डॉ. तारा भवाळकर आहेत, तर पाचव्या अरुणा ढेरे होत्या. संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी आधी साहित्य महामंडळाने पुण्यात शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली होती. घटक संस्थांकडून साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या नावांवर चर्चा करून भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

प्रा. (डॉ.) तारा भवाळकर या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणार्‍या एक मराठी लेखिका आहेत.  लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा अन् लोककला या विषयांचे लेखन आणि त्यांचा गाढा अभ्यास आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केले आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांचे योगदान आहे.