|
पाटलीपुत्र (बिहार) – इस्कॉन या आध्यात्मिक संस्थेच्या पाटलीपुत्र आणि भागलपूर येथे असलेल्या मंदिरांतील पुजार्यांमध्ये मंदिर व्यवस्थापन अन् नियंत्रण यांवरून वाद उद्भवल्याचे समोर आले आहे. ६ ऑक्टोबरला तर या वादाची परिणीती हाणामारीत झाली. त्यात १२ हून अधिक पुजारी घायाळ झाले. या मंदिरांच्या अध्यक्षांनी मंदिरांचे व्यवस्थापन, तसेच अन्य सूत्रे यांवरून एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.
१. भागलपूर येथील इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष रक्षक गिरिधारी दास यांनी पाटलीपुत्र येथील इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष कृष्णा कृपा दास उपाख्य कन्हैया सिंह यांच्यावर ते एका मुलीसमवेत अर्धनग्न अवस्थेत असल्याचा कथित व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
२. इस्कॉनचे जनसंपर्क अधिकारी नंद गोपाल दास यांनी सांगितले की, प्रसिद्ध झालेला व्हिडिओ हा ७ वर्षांपूर्वीचा आहे; पण आता त्यावरून भांडण चालू झाले आहे.
३. पाटलीपुत्र येथील मंदिरात पैशांची उधळपट्टी, अश्लील कृत्ये आणि महिला भक्तांचा विनयभंग, ब्रह्मचारींना मारहाण यांसह इतर अनेक ‘अनैतिक’ कृत्ये होत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या उच्चपदस्थ अधिकार्यांना याविषयी कल्पना आहे, असेही म्हटले जात आहे. या संदर्भात भागलपूर इस्कॉन मंदिराच्या ब्रह्मचारींनी कोलकाता येथील इस्कॉनच्या नियामक मंडळ आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पाटलीपुत्र येथील इस्कॉनच्या अधिकार्यांनी भागलपूर येथील पुजार्यांना पाटलीपुत्र येथे बैठकीसाठी बोलावून त्यांना रक्षकांकरवी मारहाण केली.
४. या संदर्भात पोलीस उपअधीक्षक कृष्णा मुरारी प्रसाद यांनी सांगितले की, इस्कॉन मंदिरांच्या नियंत्रणावरून अंतर्गत गटबाजीमुळे हा संघर्ष झाल्याचे लक्षात आले.
संपादकीय भूमिकासंबंधित गंभीर आरोपांची शहानिशा होणे आवश्यक आहेच ! असे असले, तरी हिंदूसंघटनाची कधी नव्हे, इतकी आवश्यकता असतांना मंदिरांतील अंतर्गत वादाचे प्रकरण प्राधान्याने सोडवले गेले पाहिजे ! अन्यथा हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी हिंदुद्वेष्ट्या शक्ती टपलेल्याच आहेत, हे विसरून चालणार नाही ! |