प्रयागराज – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ६ ऑक्टोबर या दिवशी प्रयागराजमध्ये ‘महाकुंभ-२०२५’च्या चिन्हाचे (लोगोचे) अनावरण केले. तसेच त्यांनी महाकुंभविषयी माहिती देणारे संकेतस्थळ आणि ‘अॅप’ यांचेही अनावरण केले. लोगोमध्ये कुंभराशीचे चिन्ह ‘कलश’ आहे, ज्यावर ‘ओम’ लिहिले आहे. मागे संगमाचे दृश्य आहे. तसेच शहराचा रक्षक असलेल्या भगवान श्री हनुमानाची प्रतिमा आणि मंदिर आहे.
१. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि जलशक्ती मंत्री स्वतंत्रदेव सिंह यांच्या उपस्थितीत अधिकार्यांसोबत महाकुंभाच्या सिद्धतेची आढावा बैठक घेतली.
२. ‘महाकुंभ २०२५’चा ‘लोगो’, महाकुंभ वेबसाइट आणि अॅप यांचा इतर प्रचार माध्यमांसह वापर केला जाईल. भाविक आणि पर्यटक यांना महाकुंभला विमान, रेल्वे आणि रस्ते या मार्गांनी पोचण्यासाठी ‘वेबसाइट’ मार्गदर्शक म्हणून काम करेल.
३. संकेतस्थळ आणि ‘अॅप’ यांद्वारे प्रयागराजमधील निवास व्यवस्था, स्थानिक वाहतूक, पार्किंग, घाटावर जाण्याचे दिशानिर्देश आदींची माहिती उपलब्ध होणार आहे. यात ‘महाकुंभच्या परिसरात कसे जायचे ? आणि धार्मिक कार्यात सहभागी कसे व्हावे ?’, याविषयी तपशीलवार माहिती दिली जाईल. कुंभमेळ्यातील सर्व कार्यक्रमांचे वेळापत्रक आणि इतर महत्त्वाच्या उपक्रम यांची माहितीही उपलब्ध असेल.